कोल्हापूर, राजेंद्र जोशी : भारतीय औषधांच्या बाजाराचे आकारमान सुमारे दीड लाख कोटी रुपयांवर गेले आहे. या मोठ्या बाजारात हात धुऊन घेण्यासाठी ड्रग माफियांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत.
या टोळ्यांची मजल कुठवर जावी? काही वर्षांपूर्वी जगातील एका बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या एका लोकप्रिय औषधाच्या ब्रँडस्चे उत्पादन करण्यासाठी उत्तर भारतात एक प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पातून संबंधित औषधाच्या कोट्यवधी रुपयांची राजरोस विक्री बाजारात सुरू होती. तरीही याचा सुगावा लागण्यासाठी खुद्द कंपनीला काही महिन्यांचा कालावधी लागला.
बाजारातील आपल्या औषधांचा खप होतो आहे. परंतु, खपाइतकी औषधे कंपनीतून जात नाहीत, असे कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई झाली, बनावट कंपनीचा गाशा गुंडाळला. पण या कालावधीत ज्यांनी संबंधित औषधांचे सेवन केले, त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे. देशात बनावट आणि दर्जाहीन औषधांच्या व्यापारासाठी उत्तर भारत हे केंद्र बनले आहे. या व्यवहाराची दिल्लीजवळ आग्रा ही राजधानी समजली जाते.
आग्र्यातून अशा टोळ्यांचे सदस्य देशभरातील औषध बाजारात फिरतात. औषध खरेदीसाठी औषध कंपन्याच्या प्रतिनिधींशी संधान बांधतात. वितरकाला रोख पेमेंटचे आमिष दाखवितात आणि लाखो रुपयांची औषधे आग्र्याच्या दिशेने जातात. या अस्सल औषधांची शेजारील देशात जशी तस्करी होते, तशी ही अस्सल औषधे हुबेहूब बनविलेल्या बनावट औषधांमध्ये मिसळून त्याची देशात विक्री केली जाते. (क्रमश:)