कोल्हापूर : कर्नाटकला हिसका दाखवा!; सीमावासीयांची आर्त हाक, धरणे आंदोलनात कोल्‍हापूरची एकजूट | पुढारी

कोल्हापूर : कर्नाटकला हिसका दाखवा!; सीमावासीयांची आर्त हाक, धरणे आंदोलनात कोल्‍हापूरची एकजूट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘नाही नाही, कधीच नाही, कर्नाटकात राहणार नाही’… असा एकमुखी निर्धार करत एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवा आणि महाराष्ट्राची 12 कोटी जनता सीमावासीयांच्या मागे आहे हे दाखवून द्या, कर्नाटक सरकारला हिसका दाखवा, अशी आर्त हाक महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, अशी मागणीही यावेळी केली. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ असा एल्गार सीमावासीयांनी केला.

सीमालढ्यात सदैव अग्रभागी असणार्‍या कोल्हापूरकरांनी आजही एकजुटीचे दर्शन घडवत सीमावासीयांच्या मागे ठाम असल्याचे दाखवून दिले.

‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी सारा मार्ग दणाणून सोडत भगवे ध्वज, भगव्या, पांढर्‍या टोप्या घालून ज्येष्ठांसह तरुण व महिला सीमावासीय रॅलीने कोल्हापुरात दाखल झाले. कोगनोळी टोल नाक्याजवळ त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत सीमावासीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. त्यांच्यासमवेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बेळगावात होणारा महामेळावा कर्नाटकने दंडेलशाही करत दडपला. घटनेने दिलेले अधिकार पायदळी तुडवत प्रत्येक आंदोलन चिरडले जाते. प्रत्येक कार्यक्रमाला अटकाव होतो, अटक केली जाते. यामुळे आम्ही देशाचे स्वातंत्र्य भोगत नसून, गुलामासारखी वागणूक देणार्‍या कर्नाटकच्या पारतंत्र्यात आहोत, हे दुखणे मांडण्यासाठी आज कोल्हापुरात आल्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आंदोलकांसमोर सांगितले. महाराष्ट्र सरकार ठराव करते, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. सीमावासीयांसाठी महाराष्ट्राने एक दिवस बंद पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्नाटकच्या जोखडातून बाहेर काढा : अष्टेकर

बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले, देशाला आधार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. त्यामुळे महाराष्ट्राने सीमाबांधवांना कर्नाटकच्या जोखडातून बाहेर काढावे. या प्रश्नावर संसदेत चर्चा घडवून आणावी. कर्नाटकात एकी दिसते. मात्र या प्रश्नावर महाराष्ट्रात एकी दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन सर्वपक्षीयांनी एकी करून कर्नाटकला इंगा दाखवावा, असे आवाहन केले.

कर्नाटकचे पाणी बंद केल्यास वाईट अवस्था होईल, याची जाणीव ठेवावी, असा इशारा देऊन खा. संजय मंडलिक म्हणाले, पक्षभेद विसरून संपूर्ण कोल्हापूर आणि महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठीशी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी त्यांनी केली. खा. धनंजय महाडिक म्हणाले, सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रात यावीत, ही भूमिका आहे. न्यायालयात प्रश्न असताना अचानक कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार सुरू आहे. आमची गावे कर्नाटकात असल्याने त्यांनी काही मागू नये. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रात भाजप सरकार असल्याने हा प्रश्न लवकर सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, सीमाप्रश्नी केंद्र व राज्य सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नव्या जोमाने सुरू केली पाहिजे. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील म्हणाले, सीमाभागातील मराठी माणूस मेंढरे नाहीत. त्यांना जगण्याचे स्वातंत्र्य द्या. माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, सीमा प्रश्नाचे 66 वर्षे भिजत घोंगडे आहे. सर्वपक्षीय जनता सीमावासीयांच्या पाठीशी आहे. विजय देवणे म्हणाले, मराठी माणसांना कर्नाटक बंदी करू नये. महाराष्ट्र बंदचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेऊ. महामेळावा दडपणार्‍या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नाकावर टिच्चून शिनोळीत मेळावा घेऊन दाखवू. राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानाची भेट घेऊन हा प्रश्न मांडावा, असे आवाहन त्यांनी केले.

आर. के. पोवार म्हणाले, सीमाबांधवांसाठी कोल्हापूरची जनता रस्त्यावर आली आहे. सर्वपक्षीय नेते आणि जनता सीमाबांधवांच्या पाठीशी कायमपणे राहतील. संजय पवार म्हणाले, महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठीशी कायमपणे ठाम उभा आहे. कर्नाटकच्या हुकूमशाहीची तीव्रता वाढत आहे. कर्नाटकातील आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्र पाठीशी असल्याने कर्नाटकच्या हुकूमशाहीला भीक न घालता संघर्ष करावा, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले.

यावेळी सुजित चव्हाण, अनिल घाटगे, पद्माकर कापसे, अपंग संघटनेचे संजय पोवार, पुंडलिक जाधव, कुमार जाधव यांची भाषणे झाली.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कोल्हापुरातील सर्वपक्षीयांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले. निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी यावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी केली. शिष्टाचारानुसार बाहेर येणे उचित ठरणार नाही. मात्र, सीमावासीयांसाठी बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची तयारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी दाखवली. ते निवेदनासाठी बाहेर येणार, तोपर्यंत शिष्टमंडळाने त्यांच्या दालनात प्रवेश करत त्यांना निवेदन दिले. निवेदन देताना बेळगावचे माजी महापौर प्रकाश शिरोळकर आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाजपचे महेश जाधव यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. मात्र, उपस्थितांनी त्वरित हा वाद मिटवला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, आर. एन. चौगुले, शिवाजीराव सुंठकर, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. श्याम पाटील, रेणू किल्लेकर, सरिता पाटील आदींसह कोल्हापुरातून ए. वाय. पाटील, सचिन चव्हाण, महेश जाधव, राहुल चिकोडे, डॉ. टी. एस. पाटील, विक्रांत पाटील-किणीकर, दिलीप पवार, कादर मलबारी, विजय करजगार यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

‘पुढारी’कारांचा पाठिंबा

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सीमा लढ्यास नेहमीच पाठिंबा दिला आहे. जानेवारीत सीमा परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र करण्याची ग्वाही जाधव यांनी दिल्याचे एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी सांगितले.

Back to top button