कोल्हापूर : शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक ढासळतोय | पुढारी

कोल्हापूर : शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक ढासळतोय

कोल्हापूर, आशिष शिंदे : वाढत्या वायू प्रदूषणामुळे स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरला अक्षरश: प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. वातावरणातील बदल, खोदकाम आणि शहरातील रस्त्यांची लागलेली वाट यामुळे हवेमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, वायू गुणवत्ता निर्देशांक 127 च्या घरात पोहोचला असून या हवेत दीर्घकाळ राहिल्यास व्याधिग्रस्त लोक, लहान मुले आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात सांगण्यात आले आहे. यामुळे हे वाढते धुलिकण शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत आहेत.

नोव्हेंबरची स्थिती

नोव्हेंबर महिन्यामध्ये दाभोळकर कॉर्नर परिसरामधील वायू गुणवत्ता एकदाही उत्तम आढळून आली नाही. येथील वायू गुणवत्ता निर्देशांक 101 ते 200 च्या घरात आहे. ही धोक्याची घंटा असून या हवेमध्ये दीर्घकाळ राहिल्यास श्वसनीय विकार जडू शकतात.

…काय आहे गुणवत्ता निर्देशांक

वायू गुणवत्ता निर्देशांकाने (एअर क्वालिटी इंडेक्स ) हवेची गुणवत्ता ठरवली जाते. हे एक संख्यात्मक प्रमाण आहे. या निर्देशांकातील वाढ ही वायू प्रदूषण आणि मानवी आरोग्यास असणारा धोका दर्शविण्यास मदत करते. 50 च्या आतील हवा उत्तम मानली जाते.

दाभोळकर कॉर्नर परिसर डेंजर!

वाढलेली थंडी, हवेचा मंदावलेला वेग आणि धुळीचे लोट यामुळे वायू प्रदूषण अधिक धोकादायक बनत आहे. कोल्हापूरकरांचा मॉर्निंग वॉक धूर, धूळ आणि धुक्यात होत आहे. दाभोळकर कॉर्नर परिसरातील वायू गुणवत्ता निर्देशांक 127 पर्यंत गेला आहे. तर श्वसनीय धुलिकणांचे प्रमाण 141 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत वाढले आहे.

Back to top button