कोल्हापूर : महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राधानगरी तालुक्यातील ४७६४ लाभार्थी! | पुढारी

कोल्हापूर : महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राधानगरी तालुक्यातील ४७६४ लाभार्थी!

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची दुसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील ४७६४ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे.

कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजप आणि शिंदे यांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले.

शिंदे सरकारने सत्तेवर आल्यानंतर तीन महिन्यांनी १३ ऑक्टोबर रोजी प्रोत्साहनपर अनुदानाची लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील ११७०६ लाभार्थ्यांचा समावेश होता. गेले दोन महिने लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील यादीची प्रतीक्षा होती. आमदार प्रकाश आबिटकर यांनी याबाबत पाठपुरावा करून डिसेंबर अखेर लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर होईल याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकातून दिली होती. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर झाली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील १६,४७० शेतकऱ्यांचा समावेश प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button