अनेगा वडा ठरला कोल्हापूरचा नंबर १ वडा

अनेगा वडा ठरला कोल्हापूरचा नंबर १ वडा
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' व टोमॅटो एफएमच्या वतीने 'कोल्हापूरचा नंबर 1 वडा' ही स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये अनेगा वडा सेंटरने पहिला क्रमांक पटकावला.

मिसळसोबतच कोल्हापुरातील वेगवेगळे वडा सेंटर चवीसाठी प्रसिद्ध आहेत. खवय्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय घेऊन दै. 'पुढारी' व टोमॅटो एफएमच्या वतीने 'कोल्हापूरचा नंबर 1 वडा' ही स्पर्धा घेण्यात आली. शहर आणि परिसरातील प्रसिद्ध 21 वडा सेंटरनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत कोळेकर तिकटी येथील अनेगा वडा सेंटरने पहिला क्रमांक पटकावला. आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट आणि प्रशस्ती पत्रक देऊन अनेगा वडा सेंटरचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेअंतर्गत 23 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत परीक्षकांच्या टीमने स्पर्धक वडा सेंटरला भेट देऊन वड्याची चव, दुकानाची स्वच्छता, ग्राहक सेवा, ग्राहकांशी होणारा संवाद याची चाचपणी केली. एकूण सहभागी 21 स्पर्धकांमधून टॉप 5 वडा सेंटरची निवड झाल्यानंतर व्हॉटस्अ‍ॅप, एसएमएसद्वारे वोटिंग घेण्यात आले होते.

बक्षीस वितरणाचा जल्लोष

प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या अनेगा वडा सेंटरसमोरच छोटेखानी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. ढोल-ताशांच्या गजरात बक्षिसाची ट्रॉफी कोळेकर तिकटी येथे आणण्यात आली.

दै. 'पुढारी'चे सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर यांच्या हस्ते अनेगा वडा सेंटरचे मालक राजेंद्र कुलकर्णी आणि राजश्री कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टोमॅटो एफएमचे प्रोग्राम हेड विद्यासागर अध्यापक, व्यवस्थापक मयूर तांबेकर, इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, प्रशांत कुरणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विश्वराज जोशी यांनी तर सूत्रसंचालन आर.जे. रसिका यांनी केले. आभार आर.जे. जाहीद यांनी मानले. यावेळी अशोक कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, तेजस्विनी कुलकर्णी, विजया कुलकर्णी, राजेंद्र मालगावे, सचिन कासार आदी उपस्थित होते.

टॉप 5 वडा सेंटर

अनेगा वडा सेंटर : विजेता
अंकल वडा सेंटर
(कसबा बावडा)
यश वडा सेंटर
(खासबाग)
प्रियदर्शनी वडा सेंटर
(रंकाळा)
शामचा वडा
(शिवाजी विद्यापीठ)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news