कोल्हापूर जिल्ह्यात 37 लघू पाटबंधारे प्रकल्पांना मिळणार मुहूर्त! | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात 37 लघू पाटबंधारे प्रकल्पांना मिळणार मुहूर्त!

कोल्हापूर, सुनील सकटे : जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील 37 लघू पाटबंधारे तलावांसाठी निविदा प्रक्रियापूर्ण केली असून, सुमारे 52 कोटींच्या कामांना लवकरच मुहूर्त लागणार आहे. या प्रकल्पात सुमारे 750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कामांना स्थगिती होती. आता स्थगिती उठल्याने प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे.

जिल्ह्यातील 51 कोटी 90 लाख 7 हजार 493 रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी ल.पा. तलावाच्या 25 कोटी 1 लाख 66 हजार 493 रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील 250 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील 36 विविध प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांसाठी 26 कोटी 88 लाख 41 हजार 767 रुपयांना मंजुरी दिली आहे. या निधीतून लघू पाटबंधारे तलाव बांधण्यात येणार आहेत.

गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक प्रकल्प

जिल्ह्यात 36 पैकी 13 प्रकल्प गडहिंग्लज तालुक्यात आहेत. कागल तालुक्यात 5, भुदरगडमध्ये 6, करवीर आणि चंदगडमध्ये प्रत्येकी 3, हातकणंगले व आजरा तालुक्यात प्रत्येकी दोन; तर राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यांत प्रत्येकी एक प्रकल्प होणार आहे.

Back to top button