कोल्हापूर : तरसंबळे ग्रा.पं. निवडणुकीसाठी चुरशीने फेरमतदान | पुढारी

कोल्हापूर : तरसंबळे ग्रा.पं. निवडणुकीसाठी चुरशीने फेरमतदान

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : तरसंबळे (ता. राधानगरी) येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.२०) झाली. दरम्यान, प्रभाग तीनमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी करताना ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज (दि.२३) फेरमतदान घेण्यात आले. यावेळी 336 पैकी 312 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दोन्ही आघाड्यांना मुंबई, पुणे, इचलकरंजी येथे असलेल्या शंभरवर मतदारांना पुन्हा एकदा मतदानासाठी आणण्याची यातायात करावी लागली. दरम्यान, आज सायंकाळी सातच्या दरम्यान राधानगरी तहसील कार्यालयात तहसीलदार मीना निंबाळकर- बाबर यांच्या उपस्थितीत मतमोजणी होईल. या निकालावर लोकनियुक्त सरपंच कोण याचा फैसला ही होणार आहे. येथील सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन समर्थक उमेदवारांमध्ये लढत झाली आहे.

तरसंबळे ग्रामपंचायत मध्ये एकनाथ पाटील, विद्यमान सरपंच गणपती कांबळे, बळवंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ ज्योतिर्लिंग महाविकास आघाडी आणि एकनाथ धामणे, नारायण रेडेकर, शामराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडी अशा दोन स्थानिक आघाड्यांमध्ये सात जागा आणि थेट सरपंच पदासाठी दुरंगी लढत झाली.

दोन प्रभागांच्या मतमोजणीत सत्तारूढ आघाडीला तीन जागा तर विरोधी आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. शिवाय या दोन प्रभागात सत्तारूढ आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा राजाराम सुतार यांना 434 मते तर विरोधी आघाडीच्या उमेदवार साताबाई कृष्णा आंबेकर यांना 360 मते मिळाली. सुतार या 74 मताने आघाडीवर असून प्रभाग तीन मधील मतमोजणीनंतर लोकनियुक्त सरपंच कोण आणि बहुमत कोणाचे याचा फैसला होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button