ग्रामपंचायत रणांगण निकाल : करवीरमध्ये काँग्रेसच श्रेष्ठ असल्याचे चित्र | पुढारी

ग्रामपंचायत रणांगण निकाल : करवीरमध्ये काँग्रेसच श्रेष्ठ असल्याचे चित्र

कसबा बावडा; पवन मोहिते : करवीर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींपैकी 31 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची, 04 ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची, 03 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना (नरके गट), 13 ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांची तर 2 ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय आघाड्यांची सत्ता आली आहे. यापैकी करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस (पी. एन. पाटील गट) 13, शिवसेना (नरके गट) 3, स्थानिक आघाड्यांची 13 तर सर्वपक्षीय आघाड्यांची 2 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 21 पैकी 18 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस (सतेज पाटील गट) तर 3 ग्रामपंचायतींमध्ये भाजपची (महाडिक गट) सत्ता आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार पी. एन. पाटील तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तालुक्यात साठ टक्के ग्रामपंचायतमध्ये वर्चस्व ठेवून पुन्हा एकदा करवीरमध्ये काँग्रेसच श्रेष्ठ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

करवीर तालुका विधानसभेचे दोन मतदारसंघात विभागला आहे. दोन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील 21 पैकी 18 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवून पुन्हा एकदा आ. सतेज पाटील व आ. ऋतुराज पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील 32 ग्रामपंचायतींच्या अत्यंत चुरशीने व अटीतटीने झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. 13 ठिकाणी काँग्रेसचे सरपंच आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे फक्त तीन ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. पी. एन. पाटील गटाने जोरदार मुसंडी मारली आहे.

अनेक ठिकाणी सत्तांतर, धक्कादायक निकाल लागले आहेत. येणार्‍या काळात या गावांच्या कार्यक्षेत्रात असणारे कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, राजाराम कारखाना या दोन कारखान्यांबरोबर पंचायत समिती करवीर, जिल्हा परिषद, बाजार समिती या निवडणुका होणार आहेत. त्यावर या ग्रा.पं.मधील निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार आहे.

तालुक्यात 29 ग्रा.पं.मध्ये सत्तातर घडून आले आहे तर 24 ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. अनेक गावात पक्ष बाजूला ठेवून भावकी, पै-पाहुणे, गट-तट पाहून सोयीच्या स्थानिक झाल्या. त्यामुळे पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या आघाड्यात विभागले गेले. त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक आघाड्यात विभागलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षीय राजकारणात आणण्यासाठी इच्छुक उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघातील सांगरुळ हे गाव नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी राहिले आहे. येथील सत्तेचा विधानसभा, कुंभी कारखाना व अन्य निवडणुकीवर प्रभाव पडत असतो. येथे पी. एन. पाटील गटाचे गोकुळचे संचालक काँग्रेसचे बाळासाहेब खाडे यांनी सरपंचपदासह 15 जागा जिंकत विरोधी आघाडीचे पानिपत केले. विरोधी आघाडीला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले. कसबा बीड येथे काँग्रेसचे 10 सदस्य निवडून आले, मात्र सरपंचपद नरके गटाच्या कुंभी कारखान्याचे संचालक उत्तम वरुटे यांनी खेचून आणत मुसंडी मारली आहे. त्यांनी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे बंधू शामराव सूर्यवंशी यांचा पराभव केला. येथे सरपंच नरके गटाचा व सदस्य बलाबल काँग्रेस पी. एन. पाटील गटाचे अशी स्थिती आहे. सावर्डे दुमाला येथे काँग्रेसचा सरपंच व सर्व 9 सदस्य एकतर्फी निवडून आले आहेत. येथे शिवसेनेचा धुव्वा उडवत काँग्रेसने सत्तांतर केले आहे.

आरळे येथे काँग्रेस-भाजप आघाडीचे माजी उपसरपंच युवराज भोगम यांच्या पत्नी वैशाली भोगम व त्यांचे सर्व 9 सदस्य निवडून आले आहेत. भोगावती खोर्‍यात लक्षवेधी ठरलेल्या कांडगाव ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप आघाडीने सरपंचपदासह बहुमत मिळवत सत्तांतर घडविले आहे. येथे माजी करवीर पं. स. सदस्या जयश्री मेडशिंगे यांना पराभव पत्कारावा लागला. वरणगे येथे स्थानिक आघाडीने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर पाटील यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठ्या वडणगे ग्रामपंचायतीत सदाशिव पाटील (मास्तर) गटाने काँग्रेसच्या माजी जि. पं. सदस्य बी. एच. पाटील गटाचा दारुण पराभव करत सत्तांतर घडविले आहे.

ईर्ष्येने मतदान झालेल्या गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये भाजपचे सरपंच करत सत्तांतर घडवले. लक्षवेधी त्याचबरोबर शहरानजीक असलेल्या उजळाईवाडी, उचगाव ग्रा.पं.मध्ये आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेसचा सरपंच करत सत्ता कायम राखली.

सरपंचपदाचे राजकीय बलाबल

सरपंच : एकूण 53
राष्ट्रवादी – निरंक
काँग्रेस – 31
भाजप – 04
नरके गट – 03
शिवसेना ठाकरे – निरंक
स्थानिक व सर्व पक्षीय आघाड्या – 13 + 2

Back to top button