कोल्हापूर : पंचगंगा शुद्धीकरण कागदावरच! | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा शुद्धीकरण कागदावरच!

कोल्हापूर; डॅनियल काळे :  पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना कागदावर दिसत आहेत. रोज 30 एमएलडी सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत मिसळते, हे वास्तव आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणीदेखील नाल्यातच मिसळत असल्याने या उपाययोजना म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी’ असेच म्हणावे लागले. परिणामी, पंचगंगेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे.
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने उभारलेल्या दोन्ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतून 96 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अजूनही रोज 30 एमएलडी सांडपाणी विनाप्रक्रिया थेट पंचगंगेत मिसळते. महापालिकेचे दावे सपशेल फेल गेले असून, लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रदूषणामुळे गतवर्षीही पंचगंगा नदीतील मासे मृत झाले होते. प्रदूषणाची तीव—ता वाढत चालली आहे.

कसबा बावडा प्रकल्प नावालाच

पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प सुरू असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 76 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्पही अपेक्षेप्रमाणे काम करत नाही. कसबा बावडा येथील एसटीपीची देखभाल करणार्‍या विश्वा कंपनीची हा प्रकल्प चालवत असताना दमछाक होत आहे.

प्रक्रियेनंतरचे शुद्ध पाणीही नाल्यातच

पंचगंगा प्रदूषणाची तीव—ता कमी करण्यासाठी दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी पाईपलाईनने राबाडे मळ्यानजीक सोडण्यात आले आहे. तेथेच दुधाळी नालाही वाहतो.
सांडपाण्यात हे प्रक्रियायुक्त पाणी मिसळते आणि हे पाणी पुढे शंभर मीटर अंतरावर नदीत मिसळते.

आणखी 6 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया

दुधाळी नाल्यातील ओव्हरफ्लो असलेले पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीत मिसळते. येथे आणखी सहा एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाचे काम सुरू असून तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. 12 नाल्यांवर बंधारे घालून हे पाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविले जाणार आहे.

द़ृष्टिक्षेपात प्रकल्प

कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
क्षमता 76 एमएलडी
प्रकल्प किंमत – 75 कोटी
विश्वा इन्फ्रा कंपनी -2014 पासून प्रक्रिया

दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
प्रकल्प क्षमता – 17 एमएलडी
प्रकल्प किंमत – 26 कोटी
लक्ष्मी इंजिनिअरिंग : जुलै 2018 पासून प्रक्रिया

Back to top button