कोल्हापूर : कौशल्य प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराचे बळ! | पुढारी

कोल्हापूर : कौशल्य प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराचे बळ!

कोल्हापूर; प्रवीण मस्के :  शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य उद्योजकता विकास केंद्राने गेल्या पाच वर्षांत सुमारे 1 लाख 13 हजार 672 विद्यार्थ्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण कौशल्य दिले आहे. परिणामी, कौशल्य प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराचे बळ मिळाल्याने 60 हून अधिक जणांनी स्वत:चे लघुउद्योग सुरू केले आहेत.

कोरोना काळात मोठ्या संख्येने युवक-युवती बेरोजगार झाले होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दिवसेंदिवस रोजगार मागणार्‍या युवकांची संख्या वाढत आहे. शिवाजी विद्यापीठात 2017 रोजी कौशल्य उद्योजकता विकास केंद्र सुरू झाले. तरुणांना कौशल्याचे प्रशिक्षण देणे, उद्योगाचे प्रशिक्षण, गरज व उपलब्ध कौशल्य मोजणे त्याचबरोबर रोजगार आणि स्वयंरोजगार विकसित करणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत.
दरवर्षी केंद्रातर्फे विद्यापीठ संलग्न 282 महाविद्यालये आणि विद्यापीठ कॅम्पसवरील 50 हजारांहून विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी इन्फोसिस कंपनीने प्रशिक्षित केलेले 179 तज्ज्ञ प्राध्यापक कार्यरत आहे. 1 तास ते 1 वर्ष मुदतीपर्यंतची सर्व प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांना दिली जातात. यात जीवन कौशल्य व उद्योजकीय कौशल्याचा समावेश आहे. याचबरोबरच दिव्यांग, तृतीयपंथीय यांनाही कौशल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्यात कार्यक्रमाच्या माध्यमातून कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.

व्यवसायाचे प्रशिक्षण

कौशल्य उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने चॉकलेट मेकिंग, गूळ क्लस्टर ट्रेनिंगसह विविध महत्त्वाच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल लिटरसी व पुणे येथील इन्फोसिस कंपनीस प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण दिले आहे.

Back to top button