कोल्हापूर : विजयाचा जल्लोष; कहीं खुशी, कहीं गम | पुढारी

कोल्हापूर : विजयाचा जल्लोष; कहीं खुशी, कहीं गम

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच जल्लोषाला सुरुवात झाली. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जिल्ह्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ सुरू असलेला सत्तासंघर्ष निकाल बाहेर येताच शांत झाला. ‘घासून नाही, तर ठासून आलोय’ म्हणत विजयी उमेदवार आणि आघाड्यांनी गावागावांत जल्लोष केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने 88 टक्के मतदान झाले होते. गावागावांत निवडणुकीची ईर्ष्या सुरू होती. स्थानिक गट, आघाड्या आणि काही गावांत सत्तेसाठी भाऊबंदकीही एकमेकांसमोर उभी ठाकली होती. दहा ते बारा दिवस जिल्हाभर प्रचाराने रान उठले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. करवीर तालुक्यातील मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. नऊ वा.पासून निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली. करवीर तालुक्यातील चुरशीच्या लढतींचे निकाल बाहेर येताच गुलालाची उधळण करत जल्लोषाला सुरुवात झाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

‘भावा गुलाल आपलाच, आता सुट्टी नाही, घासून नाही, तर ठासून आलोय’ अशा घोषणा देत तरुण कार्यकर्ते गावाकडे रवाना झाले. प्रत्येक गावातील चौकाचौकांत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकांना बंदी असली, तरी विजयी उमेदवारांच्या घरासमोर साऊंड सिस्टीमच्या तालावर जल्लोष सुरू होता.

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पोलिसांनी वाहनांच्या पुंगळ्या काढून सायलेन्सरचा आवाज काढत गावातून फेरफटका मारणार्‍या मोटारसायकलस्वारांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीदेखील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी दुचाकीच्या पुंगळ्या काढून जल्लोष केला. प्रत्येक गावात जल्लोषात महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. महिलांनी फुगडी खेळून जल्लोष व्यक्त केला. पराभूतांच्या गोटात मात्र शांतता होती. पराभवाचे आत्मपरीक्षण करत आपण कोठे कमी पडलो याची आकडेमोड करत होते. काही जणांनी पैशाचा विजय झाला, असे म्हणत पराभवाचे खापर फोडले. ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण गावागावांत होते. संवेदनशील भागात पराभूत उमेदवारांच्या घरांसमोर पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Back to top button