

शिरोली पुलाची; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह 17 पैकी 16 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी शाहू स्वाभिमानी आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आमदार सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे.
शिरोली ग्रामपंचायतीवर मागील निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शाहू स्वाभिमानी आघाडीची सत्ता होती. त्यावेळी सरपंच शशिकांत खवरे सरपंच झाले, तर विरोधी आमदार अमल महाडिक गटाचे कृष्णात करपे यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. यावेळी नेमकी उलटी स्थिती झाली. अमल महाडिक यांनी या निवडणुकीत पुन्हा माजी उपसरपंच पिंटू करपे यांच्या पत्नी पद्मजा करपे यांना संधी दिली; तर विरोधी शाहू स्वाभिमानी आघाडीकडून माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांच्या पत्नी रूपाली खवरे यांना संधी दिली होती. त्यामुळे गेल्या वेळी प्रमाणेच यावेळीही खवरे करपे अशीच थेट लढत होती. या निवडणुकीत पद्मजा करपे यांनीरूपाली खवरे यांचा चार हजार मतांनी पराभव केला तर सदस्यांत साधारणता फक्त दहा पासून आठशे पर्यंत फरक आहे.
या निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद,वैयक्तिक भेटी या रणनीतीचा जोराचा अवलंब करण्यात आला होता. दोन्ही गटाकडून सत्तेचा दावा केला जात होता परंतु मतमोजणीत धक्कादायक निकाल हाती आले. यामध्ये अंमल महाडिक यांच्या ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासह सोळा जागावर यश संपादन केले तर विरोधी सतेज पाटील यांच्या शाहू स्वाभिमानी आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. निकाल हाती आल्यानंतर प्रभाग चार मधील उमेदवार हसीना संनदे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केला.त्या दहा मतांनी तर सरदार मुल्ला 60 मतांनी पराभव झाला. निकालानंतर महाडिक पंपा सह गावात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करण्यात आली.
महाडिक पंपापासून दुपारी दोनच्या पासून गावातील मुख्य रस्त्यावरून ओपन जीप वरून भाजपच्या महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा शौमिका महाडिक विजयी सरपंच उमेदवार पद्मजा करपे यांच्यासह माजी उपसरपंच पिंटू करपे वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील शिवसेना, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती डॉ. सोनाली पाटील, पुष्पा पाटील, बबासो कांबळे,सलीम महात व विजयी उमेदवार सहभागी होते. या मिरवणुकीवेळी कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या तालावर एकच ठेका धरत जल्लोष केला. छत्रपती ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला सरपंच पद्मजा करपे व भाजपा महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते हार घालण्यात आला. त्यानंतर मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली.
ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होतात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गावात सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे या निवडणुकीत त्यांचा करिष्मा दिसून आल्याची चर्चा आहे.