कोल्हापूर : वैशिष्ट्यपूर्ण निकालांमुळे लक्षवेधी ठरली निवडणूक | पुढारी

कोल्हापूर : वैशिष्ट्यपूर्ण निकालांमुळे लक्षवेधी ठरली निवडणूक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींतील सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी हाती येऊ लागले आणि त्यातील काही निकाल वैशिष्ट्यपूर्ण ठरले. काही ठिकाणी प्रस्थापितांचे गड उद्ध्वस्त, तर काही ठिकाणी मतदारांनी परिवर्तन घडवून युवा चेहर्‍यांना संधी दिली. यात कुणाच्या मातोश्रींचा, तर कुणाच्या सासूबाईंचा झालेला विजय लक्षवेधी ठरला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील टाकळी येथे दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.

तब्बल 65 वर्षांनी भाजपचा झेंडा

नागपूर जिल्ह्यातील मेंढेपठार ग्रामपंचायतींवर तब्बल 65 वर्षांपासून असलेली चिखले कुटुंबीयांची सत्ता यंदा गावकर्‍यांनी संपुष्टात आणली आहे. तेथे राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर चिखले यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. ग्रामपंचायतीतील सरपचांसह आठही जागा युवा ग्राम विकास परिवर्तन पॅनलने जिंकल्या. या पॅनलने भाजपच्या पाठिंब्याने यंदाची निवडणूक लढवली.

इंदोरीकर महाराजांच्या सासू सरपंचपदी

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार शशिकला शिवाजी पवार यांनी सरपंचपदी विजय मिळवला. त्या इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई आहेत.

आ. पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदी

आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली असून पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंचपदावर विजयी झाल्या.

भाविनी पाटील विजयी, पण…

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विजयी झाल्या. मात्र त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झाले.

संदीप क्षीरसागर यांची काकांना धोबीपछाड

संदीप क्षीरसागर यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाड मिळाली. नवगन राजुरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली.

राज्यात नव्या मैत्रीची पहिली ग्रामपंचायत

अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर शिवशक्ती-भीमशक्ती आघाडीची एकहाती सत्ता आली. सरपंचपदी नंदकिशोर गोरले विजयी झाले.

यवतमाळमध्ये 45 वर्षांनी कमळ फुलले

यवतमाळ तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीत 45 वर्षानंतर पहिल्यांदाच कमळ फुलले.

आजोतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायतीत सरपंचपदासह राष्ट्रवादीचा गट निवडून येण्यासाठी अमरजीत पवार आग्रही होते. राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय आपण केस आणि दाढी काढणार नाही, असा निश्चय पवार यांनी केला होता. विजयानंतर त्यांनी पुष्पा स्टाईलने आपल्या केसांवरून आणि दाढीवरून हात फिरवत मतदारांना धन्यवाद देत आभार मानले.

मुंडे बंधू-भगिनींची रणनीती यशस्वी

बीड जिल्ह्यातील नाथरा ग्रामपंचायतीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वंचितचे आव्हान मोडून काढत विजय मिळवला आहे. धनंजय मुंडे यांचे चुलतभाऊ अभय मुंडे सरपंचपदी विराजमान झाले.

जामनेरमध्ये दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या दगडफेकीत धनराज माळी या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.

Back to top button