कोल्हापूर : ‘मविआ’ची सरशी; भाजप, शिंदे गटाची मुसंडी; 210 हून अधिक ग्रामपंचायतींत सत्तांतर | पुढारी

कोल्हापूर : ‘मविआ’ची सरशी; भाजप, शिंदे गटाची मुसंडी; 210 हून अधिक ग्रामपंचायतींत सत्तांतर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक वर्चस्वासाठीच्या 473 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सरशी झाली. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटानेही ग्रामपंचायतींत चांगली मुसंडी मारली. जिल्ह्यातील सुमारे 210 हून अधिक ग्रामपंचायतींत सत्ताधार्‍यांना मतदारांनी नाकारत सत्तांतर घडवले. गावच्या सत्ताकारणासाठी स्थानिक पातळीवर सोयीच्या झालेल्या आघाड्या, गटातटाच्या राजकारणातही विद्यमान आमदारांनी आपल्या मतदारसंघात आपली पकड कायम ठेवली असली तरी स्थानिक आघाड्या आणि गटागटांनी आपले महत्त्व कायम ठेवले.

जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र यापैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक यापूर्वीच झाली. 30 ग्रामपंचायती तर 60 सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. 429 ग्रामपंचायतींसाठी तर 414 सरपंचपदासाठी मतदान झाले. तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आज मतमोजणी झाली. सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. अर्ध्या तासात चार-पाच गावे याप्रमाणे निकाल जाहीर होत गेले. दुपारी दोनपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. विजयी उमेदवारांचा रात्री उशिरापर्यंत गावोगावी जल्लोष सुरू होता. रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडी आणि भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडून काबीज केलेल्या ग्रामपंचायतींची आकडेमोड सुरू होती. सरपंचपदाच्या सर्वाधिक उमेदवारांच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होती. त्या पाठोपाठ काँग्रेस, भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासह गगनबावडा तालुक्यात आपले वर्चस्व राखले. गगनबावड्यात 21 पैकी 19 ग्रामपंचायती त्यांनी ताब्यात ठेवल्या. आमदार पी. एन. पाटील यांनीही करवीर विधानसभा मतदारसंघात आपला प्रभाव कायम ठेवला. पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ. विनय कोरेंनी 26 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. 13 ग्रामपंचायतींत माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी सत्ता काबीज केली. पन्हाळा तालुक्यात 12 ग्रामपंचायतींत मतदारांनी सत्ताधार्‍यांना नाकारले.

शाहूवाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी 26 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. आ. कोरे यांच्याकडे 13 ग्रामपंचायती आल्या. शाहूवाडीत 18 ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. राधानगरीत स्थानिक नेत्यांचे पारंपरिक गड कोसळले. तालुक्यातील बनाचीवाडी सरपंचाच्या रूपाने माजी खासदार संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने खाते खोलले.

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी सर्वाधिक दहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. मात्र मोठ्या ग्रामपंचायतीत त्यांना धक्का बसला. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिह घाटगे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. माजी आमदार संजयसिंह घाटगे यांनीही काही ठिकाणी आपला करिश्मा दाखवला. कागल तालुक्यात दहा ठिकाणी सत्तांतर झाले. गडहिंग्लजमध्ये 34 पैकी 21 ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांना नऊ ठिकाणी धक्का बसला. बड्याचीवाडी येथील जनता दलाची अनेक वर्षांची सत्ता भाजपने हिसकावून घेतली. आजरा तालुक्यात 14 गावांत सत्तांतर झाले तर 17 गावांत सत्ता कायम ठेवण्यात सत्ताधार्‍यांना यश आले. राष्ट्रवादी काँग्रेस व चराटी-शिंपी गटाने सर्वाधिक प्रत्येकी नऊ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.

चंदगडमध्ये 19 ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील यांच्यासह स्थानिक आघाडीला ठिकठिकाणी यश मिळाले. भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही यश मिळवले. शिरोळमधील 17 पैकी 10 ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले. शिवसेना शिंदे गटाच्या आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले. हातकणंगलेल भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने बाजी मारली. 39 पैकी 22 ठिकाणी सत्ताधार्‍यांना मतदारांनी नाकारले.

तरसंबळेत फेरमतदान

तरसंबळे (ता. राधानगरी) येथील ईव्हीएममधील बॅलेट युनिटच खुले झाले नाही. यामुळे मतमोजणी करता आली नाही. यामुळे या ठिकाणी दि.23 रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे.

पती सरपंच, पत्नी सदस्य

गडहिंग्लज तालुक्यात बेकनाळ येथे पती सरपंच तर पत्नी सदस्य म्हणून विजयी झाली. भुदरगड तालुक्यात कोनवडे येथे पत्नी सरपंच झाली तर पती पराभूत झाला.

आठ उमेदवारांना समान मते

जिल्ह्यात आठ ठिकाणी उमेदवारांना समान मते पडली. चिठ्ठ्या टाकून विजयी उमेदवार निवडण्यात आला. पाचवडे ता. भुदरगड येथे दोन उमेदवारांना समान मते पडली. मात्र, एकमेव पोस्टल मतामुळे एक उमेदवार विजयी झाला.

23 वर्षांचा तरूण सरपंच

येळवडे (ता. राधानगरी) येथील ओंकार पाटोळे या 23 वर्षीय तरुण सरपंचपदी विराजमान झाला. सरूडमध्ये 15 पैकी 14 जागा शिवसेनेच्या आल्या. मात्र, एका जागेवर 25 वर्षीय तरुणाने अपक्ष म्हणून विजय मिळविला.

कुणाचे किती सरपंच?

राष्ट्रवादी काँग्रेस 89
काँग्रेस 67
शिवसेना ठाकरे गट 42
भाजप 60
शिवसेना शिंदे गट 35
जनसुराज्य शक्ती 40
स्थानिक आघाड्या 140

Back to top button