गावचे सत्ताधारी कोण, आज फैसला; दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर | पुढारी

गावचे सत्ताधारी कोण, आज फैसला; दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 429 गावांचे सत्ताधारी कोण याचा फैसला मंगळवारी (दि. 20) होणार आहे. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी चुरशीने 84.13 टक्के मतदान झाले होते. त्याच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ होईल. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी शक्यता असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 30 ग्रामपंचायती तर 60 सरपंच बिनविरोध झाले. शाहूवाडी-चनवाड ग्रुप ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. यामुळे 429 ग्रामपंचायतींसाठी आणि 413 सरपंचपदासाठी मतदान झाले. गावच्या वर्चस्वासाठी महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षात टोकाला गेलेल्या ईर्ष्येने अनेक गावांतील निवडणूक चुरशीची झाली. स्थानिक गट, आघाड्याचे प्रमुख असलेल्या नेत्यांची तसेच राजकीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतमोजणीसाठी एकूण 3 हजार 654 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरासरी 17 ते 20 टेबलवर मतमोजणी होईल. काही ठिकाणी 20 पेक्षा अधिक टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एका मतदान केंद्राची मोजणी होईल. युमळे अर्धा ते पाऊण तासात तीन-चार गावांचे निकाल लागतील. पहिल्या फेरीतील सर्व गावांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच दुसर्‍या फेरीत पुढील गावे घेतली जातील.
जिल्ह्यात मतदानादरम्यान 9 ठिकाणी कंट्रोल युनिट तर 7 ठिकाणी बॅलेट युनिट बदलावे लागले. मात्र, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून मतमोजणीस्थळी तसेच गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतरही सर्वांनी शांतता राखावी, जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

Back to top button