कोल्हापूर : जिल्ह्यात 74 प्रजातींच्या 514 पक्ष्यांची नोंद; 12 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात 74 प्रजातींच्या 514 पक्ष्यांची नोंद; 12 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कळंबा तलाव परिसरात रविवारी झालेल्या पक्षी निरीक्षणात पक्षी निरीक्षकांकडून 74 प्रजातींच्या सुमारे 514 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यात 12 प्रजातींच्या स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे.

नेचर कॉन्झव्हेर्र्शन सोसायटी (नेकॉन्स) संस्थेतर्फे कळंबा तलाव येथे पक्षी निरीक्षण व फोटोग्राफीचा उपक्रम झाला. कळंबा तलावालाही रंकाळा तलावाप्रमाणेच ऐतिहासिक महत्त्व आहे. करवीर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत 1883 साली कळंबा तलावाच्या बंधार्‍याचे बांधकाम पूर्ण झाले. एकेकाळी कळंबा गाव व आता कोल्हापूर शहराला या तलावातून पाणीपुरवठा होत होता.

माणसांप्रमाणेच निसर्गातील अन्य पशुपक्ष्यांसाठीही कळंबा तलाव महत्त्वाचा आहे. तलावाच्या काठावर झाडी, पाणथळ जागा व शेती असल्याने जलचरांसाठी आणि स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी ही एक आदर्श परिसंस्था आहे. यामुळे भविष्यात ही जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने कळंबा तलाव परिसराचे संवर्धन व्हावे यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उपक्रमाचे आयोजन नेकॉन्स संस्थेचे सदस्य धनंजय जाधव, सतपाल गंगलमाले, विवेक कुबेर, संतोष शिरगावकर, सागर कुलकर्णी व बर्डस् ऑफ कोल्हापूर ग्रुपचे वैभव देसाई यांनी केले.

निरीक्षणात आढळलेले पक्षी

स्थानिक पक्षी : हळदी-कुंकू बदक, राखी बगळा, छोटा बगळा, कवडा होला, तारवाली भिंग्री, लाजरी पाणकोंबडी, तुईया पोपट, ब—ाह्मणी घार, ऑस्प्रे गरुड, तुरेवाला सर्पगरुड.
स्थलांतरित पक्षी : कैकर, ब्लीथचा, वेळूतला वटवट्या, ठिपकेवाली तुतारी, हिरवी तुतारी, पिवळा धोबी, पांढरा धोबी, राखाडी धोबी.

Back to top button