कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचंड चुरशीने 85 टक्के मतदान | पुढारी

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचंड चुरशीने 85 टक्के मतदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : टोकाला गेलेली ईर्ष्या आणि प्रचंड चुरशीत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी सरासरी 85 टक्के मतदान झाले. मतदानासाठी महिला आणि युवतींचाही अभूतपूर्व उत्साह होता. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. किरकोळ प्रकार वगळता सर्व एक हजार 824 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सरपंचपदाच्या 414 जागांसाठी 1 हजार 193 तर 429 ग्रामपंचायतींच्या 4 हजार 402 सदस्यपदाच्या जागांसाठी 8 हजार 995 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. गावची सत्ता कोणाकडे याचा फैसला आता मंगळवारी (दि. 20) होणार आहे.

जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित 429 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

काही गावात सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी होती. सकाळी साडेनऊपर्यंत पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी 15.35 टक्के मतदान झाले.

सकाळी दहानंतर मतदार सहकुटुंब व गटागटाने मतदानासाठी बाहेर पडू लागले. यामुळे मतदान केंद्रांवरील रांगा वाढत गेल्या. उमेदवार मतदान केंद्रांबाहेर मतदारांना नमस्कार करत उभे होते. कार्यकर्ते, समर्थकही मोठ्या संख्येने थांबून राहात होते. त्यांना वारंवार पोलिसांना हटकावे लागत होते. यामुळे काही ठिकाणी पोलिसांना लाठ्याही उगाराव्या लागल्या.

मतदानाच्या दिवशीही गटा-गटाकडून, आघाड्यांच्या वतीने शक्ती प्रदर्शन सुरू होते. कोणी एकसारख्या पांढर्‍या टोप्या परिधान करून तर कोणी एकसारख्या रंगाचे फेटे परिधान करून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक मतदानासाठी एकत्र येत होते. घोषणाबाजी होत होती. यामुळे चुरस आणखी वाढत होती. मतदान केंद्राबाहेर असणार्‍या बूथवर पुरुष कार्यकर्त्यांप्रमाणेच महिला आणि युवतींचीही संख्या लक्षणीय होती. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांत उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणूनही महिला आणि युवतींनी काम पाहिले.

पहिल्या दोन तासांत 15 टक्के मतदान झाले होते. मात्र, पुढच्या दोन तासांत मतदानाचे प्रमाण 20 टक्क्यांवर गेले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 35.24 टक्के मतदान झाले. मतदानाचा वेग पुढच्या दोन तासांत असाच राहिला. दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात सरासरी 55.60 टक्के मतदान झाले. पहिल्या सहा तासांत निम्म्याहून अधिक मतदान झाले. मात्र, उर्वरित चार तासांत शिल्लक 45 टक्के मतदानापैकी अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी आघाडी, गटांचे प्रमुख, उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला. मतदान न केलेल्या मतदारांना संपर्क करून मतदानासाठी येण्याचे आवाहन केले होते. काहीजण तर घरात जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते.

दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत मतदानाचे प्रमाण काहीसेे कमी झाले. या कालावधीत मतदान 16 टक्क्यांवर आले. दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यात सरासरी 72.21 टक्के मतदान झाले होते. यामुळे अखेरच्या दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या दोन तासांत तर कार्यकर्ते, समर्थकांनी शिल्लक मतदारांना मतदानासाठी घेऊन येण्यासाठी पायाला अक्षरश: भिंगरीच बांधली होती. अखेरच्या दोन तासात मात्र 12.58 टक्के मतदान झाले. यामुळे जिल्ह्यात सरासरी 84.79 टक्के मतदान झाले. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 89.42 टक्के इतके झाले. सर्वात कमी मतदान गडहिंग्लज तालुक्यात 77.01 टक्के इतके झाले.

प्रचंड चुरस आणि उत्साह

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानात आज बहुतांशी सर्वच ठिकाणी प्रचंड चुरस आणि उत्साहच दिसत होता. काही गावांत तर एखाद्या सणासारखे वातावरण होते. निम्म्याहून अधिक महिला सदस्य असल्याने या मतदानातील महिला आणि युवतींचा सहभाग लक्षणीय होता.

वयोवृद्धांचेही उत्साहात मतदान

या निवडणुकीत खेडे (ता. शाहूवाडी) येथील हौसाबाई हरी पोवार, आंबेवाडी (ता. करवीर) येथील कमलाबाई आनंदा साळोखे, बोलोली (ता. कागल) येथील संत बाटे अशा शंभरी पार केलेल्या वयोवृद्धांनीही उत्साहात मतदान केले. आजारी, दिव्यांग यांच्यासह वृद्ध मतदारांसाठी प्रशासनासह कार्यकर्त्यांनीही ने-आण करण्याची तसेच मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था केली होती. यामुळे अशा मतदारांचेही चांगले मतदान झाले.

तृतीयपंथी मतदारांचेही मतदान

या निवडणुकीसाठी एकूण 29 तृतीयपंथी मतदार होते. दुपारी साडेतीनपर्यंत त्यापैकी 8 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

मतदान प्रक्रियेची प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी काही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यरत कक्षाकडून जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेची माहिती घेतली जात होती. या सर्व प्रक्रियेवरही शिंदे लक्ष ठेवून होते.

गावनिहाय होणार मतमोजणी

मंगळवारी (दि. 20) मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. गावनिहाय मतमोजणी होणार आहे, त्याचे नियोजन संबंधित तालुक्याचे निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी केले आहे. संवेदनशील गावांची मतमोजणी शक्यतो शेवटी केली जाणार आहे.

Back to top button