कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 3 हजारांवर पोलिस रस्त्यावर | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 3 हजारांवर पोलिस रस्त्यावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. तीन हजारांवर पोलिस शनिवारी रात्री मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे- पाटील यांनी सायंकाळी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. निवडणूक काळात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणा केल्यास संबंधितांना खात्यांतर्गत कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा देण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदारांना प्रलोभन दाखविणार्‍या समाजकंटकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान केंद्राबाहेर जमाव करून थांबण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्राबाहेर समाजकंटकाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचविण्याची यंत्रणा कार्यान्वित केल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वच मतदान केंद्रांवर फौैजफाटा

कोल्हापूर पोलिस दलातील 80 टक्के मनुष्यबळांसह 1400 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाचा फौजफाटा जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय सुरक्षा पथकाच्या अधिकार्‍यांसह जवानांना पाचारण करण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Back to top button