कोल्हापूर : मताचे वाढले ‘मोल’  | पुढारी

कोल्हापूर : मताचे वाढले ‘मोल’ 

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यात जाहीर प्रचार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाल्यानंतर समाजमाध्यमांतून मतदारांना साद घातली जात आहे; तर आर्थिक देव-घेवीला ऊत आला आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील-महाडिक गटात बहुतांश ठिकाणी लढती होत आहेत; तर करवीर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आमदार पी. एन. पाटील-माजी आमदार चंद्रदीप नरके गटात लढती होत आहेत. काही ग्रामपंचायतींत उमेदवारांनी सावध पवित्रा घेत स्थानिका आघाड्या केल्या आहेत, त्यांच्यामध्ये लढती दिसत आहेत.

तालुक्यातील शहरालगतच्या वडणगे, उचगाव, गांधीनगर, वळिवडे, पाचगाव, मोरेवाडी, गोकुळ शिरगाव, चिखली, आंबेवाडी, वाकरे या गावांतील निवडणुका लक्षवेधी ठरत आहेत.

चिखली, पाडळी खुर्द, परिते, म्हाळुंगे, दोनवडे, नागाव, कणेरीसह 10 ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण/खुले आहे. वडणगे, पाचगाव, वळिवडे, शिंगणापूर, कांडगाव, वाकरे, आंबेवाडीसह 16 ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव आहे. उजळाईवाडी, मोरेवाडी, गांधीनगरसह 6 ठिकाणी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. दिंडनेर्ली, निगवे खा., बोलोली येथे सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. सडोली दु., कसबा बीड, गोकुळ शिरगाव, उचगावसह 11 ठिकाणी सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. वसगडे, भुये, कळंबे तर्फ ठाणे, हसूर दु., सांगरूळसह 7 ठिकाणी सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे.

करवीर तालुक्यात एकूण 53 ग्रामपंचायतींपैकी 4 महिला सरपंच, तर 67 ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यातील भाटणवाडी ग्रामपंचायतीत सरपंचांसह सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यात 53 पैकी 49 ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी, तर 53 पैकी 51 ग्रामपंचायतींत सदस्यपदासाठी रणधुमाळी होणार आहे. 49 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 161, तर 51 ग्रामपंचायतींमध्ये 542 सदस्यपदासाठी 1,378 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

Back to top button