कोल्हापूर : भानामतीसाठी आल्याच्या संशयातून साधूंना दिले पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

कोल्हापूर : भानामतीसाठी आल्याच्या संशयातून साधूंना दिले पोलिसांच्या ताब्यात

सिद्धनेर्ली; पुढारी वृत्तसेवा :  बामणी (ता. कागल) येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर भानामतीचे प्रकार सुरू आहेत. गुरुवारी सकाळी चार परप्रांतीय साधू करणी व भानामतीच्या उद्देशाने आल्याच्या संशयामुळे तरुणांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकारामुळे गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.

गुरुवारी सकाळी गावांमध्ये चार चाकीमधून साधूच्या वेशातील चार व्यक्ती एका उमेदवाराचा पत्ता विचारून त्या उमेदवाराच्या घराच्या दिशेने गेले. तरुणांनी त्या गाडीचा पाठलाग करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच गाडीतील हे चार भोंदू व्हनाळीच्या दिशेने निघून गेले. मात्र, व्हनाळीजवळ पोलिसांची गाडी बघून ही गाडी परत बामणीकडे आली. त्यावेळी मुख्य रस्त्यावर थांबलेल्या काही तरुणांनी ही गाडी अडवली. गाडी अडवून त्यांची चौकशी करून त्यांना चांगलेच फैलावर घेतले. हे लोक हिंदीमध्ये बोलत होते. आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तरुणांनी अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना बोलावून गाडीमधील चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

Back to top button