कोल्हापूर : कबाना कॅपिटल कंपनीकडून सव्वा कोटीचा गंडा | पुढारी

कोल्हापूर : कबाना कॅपिटल कंपनीकडून सव्वा कोटीचा गंडा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तीन महिन्यांत पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने दुबईस्थित कंपनीने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना 1 कोटी 24 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कंपनी संचालक विवेक अरोरा (रा. भावनगर, गुजरात), अनुप जगनारायण उपाध्याय (रा. हवेली, पुणे) व गोविंद विष्णूनाथ मुळे (रा. पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उदय राजाराम शिंदे (वय 36, रा. नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

उदय शिंदे हे ब—ोकरचे काम करतात. तसेच गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करतात. संशयित अनुप उपाध्याय व गोविंद मुळे या दोघांनी त्यांच्या ऑनलाईन मीटिंगला हजेरी लावत कोल्हापुरात सेमिनार आयोजित करण्याचे सांगितले होते. 26 फेब—ुवारीला हा कार्यक्रम झाल्यानंतर कबाना कॅपिटल कंपनीची माहिती गुतंवणूकदारांना दिली होती. शिंदे यांच्या काही मित्रांनी 70 लाख रुपये, तर शिंदे यांनी 54 लाख रुपये अशी 1 कोटी 24 लाख रुपये गुंतवले. या बदल्यात त्यांना 15 ते 20 लाख रुपयांचा मोबदला मिळाल्याचे भासविण्यात आले. मात्र, दोन महिन्यांनी त्यांच्या खात्यातील ही रक्कम गायब झाली. याबाबत शिंदे यांनी विचारणा सुरू केली होती; पण पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक तपास उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.

Back to top button