कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट गटारींचे पाणी | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट गटारींचे पाणी

कसबा बावडा; पवन मोहिते :  पंचगंगा नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत आहे. शहरात निर्माण होणार्‍या 80 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले जात असले तरीही अजून मोठ्या प्रमाणात सांडपाणी पंचगंगा नदी पात्रात मिसळत आहे. राजाराम बंधारा येथे नदीपात्रात कचरा साचून राहिला आहे. पाण्याला काळपट रंग आला असून उग्र दर्प येत आहे. गटारींचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाली आहे. जयंती नाल्याचे पाणी सध्या नदीपात्रात थेट मिसळत नसले तरीही इतर छोट्या-मोठ्या नाल्यांचे पाणी आजही पंचगंगा नदीत मिसळत आहे. यावर्षी गणेश विसर्जनावेळी ‘मूर्ती आणि निर्माल्य दान करा’ अशी साद प्रशासनाच्या वतीने गणेशभक्तांना घालण्यात आली होती. याला उदंड प्रतिसाद लाभला. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी महानगरपालिकेबरोबर सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रदूषणमुक्तीबाबत नागरिक फारसे जागरूक नसल्याचे अनुभवास येत आहे. आजही घरातील पूजेचे निर्माल्य, खराब फुले, फळे नदीपात्रात टाकणे सुरूच आहे. जनावरे, गाड्या नदीपात्रात धुण्यासाठी, त्याचबरोबर धुणी धुण्यासाठी येणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे.

शहरातील 80 किलोमीटरपैकी 67 किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. आजही लक्षतीर्थ, राजहंस, रमणमाळा, ड्रीमवर्ल्ड, कसबा बावडा, बापट कॅम्प वीटभट्टी येथील नाल्यांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर घेऊन येण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून मे 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी मोठ्या प्रमाणात असून या पाण्याचा पुनर्वापर बगीच्या, औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी करावा, अशा सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत.

शहरातील अनेक भागांमधून मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. कसबा बावडा, भोसलेवाडी, कदमवाडी, जाधववाडी, मार्केट यार्ड, मुक्तसैनिक, सदरबाजार, लाईन बाजार, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, लक्षतीर्थ, रंकाळा परिसर परिसरात बहुतेक ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था नाही. या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी अमृत 2 योजनेतून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

शहरातील 80 टक्के सांडपाण्यावर लाईन बाजार आणि दुधाळी येथील प्रक्रिया प्रकल्पांवर प्रक्रिया होते. उर्वरित 20 टक्के सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर आणण्यासाठी काम प्रगतिपथावर आहे.
– आर. के. पाटील
सहायक अभियंता, कोल्हापूर महापालिका

Back to top button