वारणानगर, प्रकाश मोहरेकर : शौकिनांनी खचाखच भरलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात पंजाब केसरी-भारत केसरी प्रीतपाल फगवाडा आणि हरियाणा हिंदकेसरी उमेश मथुरा यांच्यात काटाजोड झालेल्या लढतीत प्रीतपाल फगवाडाने आठव्या मिनिटाला उमेश मथुरावर स्वारी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. त्याला 'जनसुराज्यशक्ती श्री' किताब देऊन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दुसर्या क्रमांकाच्या कुस्तीत हिंदकेसरी प्रवीण कोहली याने इराणचा जागतिक मल्ल आमीर यारी याला घुटना डावावर अस्मान दाखविले. त्याला 'वारणा साखर श्री' किताबाने गौरविण्यात आले. आमदार डॉ. विनय कोरे, युवानेते विश्वेश कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम, संचालक सुरेश पाटील, वस्ताद संदीप पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 28 व्या पुण्यस्मरणार्थ विश्वनाथ वारणा शक्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम रंगला होता. किताबाच्या 15, पुरस्कृत 30 आदी मिळून 250 वर कुस्त्यांचा थरार प्रेक्षकांना अनुभवयास मिळाला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने हे कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. दुपारी 2 वाजता वारणा बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे, ज्योतिरादित्य कोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून कुस्त्यांना प्रारंभ झाला.
या मैदानात प्रथम क्रमांकाच्या 'जनसुराज्यशक्ती श्री' किताबासाठी भारत केसरी प्रीतपाल फगवाडा (पंजाब) विरुद्ध हिंदकेसरी उमेश मथुरा (हरियाणा) यांच्यात लढत झाली. मुख्य पंच म्हणून हणमंत जाधव यांनी काम पहिले. सुरुवातीला खडाखडी झाल्यावर प्रीतपालने उमेशवर कब्जा मिळविला. यावेळी त्याने एकलंगी भरत कुस्ती चितपट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून उमेशने सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला आकडी लावत पुन्हा प्रीतपालने कब्जा मिळविला. आठव्या मिनिटाला त्याने स्वारी डावावर उमेशला चितपट करत प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
दुसर्या क्रमांकाचा इराणचा हमीद काही कारणास्तव न आल्याने 'वारणा साखर श्री'साठी इराणचा आमीर यारी विरुद्ध भारत केसरी प्रवीण कोहली (पंजाब) यांच्यात कुस्ती झाली. पाचव्या मिनिटाला प्रवीण कोहली घुटना डावावर विजयी झाला.
वारणा दूध शक्तीसाठी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर प्रदेश केसरी विजय बाबर यांच्यात आक्रमक कुस्ती झाली. सुरुवातीला पृथ्वीराजने विजयचा कब्जा घेतला. डाव-प्रतिडाव सुरू असताना बॅक साल्तो डावावर पृथ्वीराजने विजयला अस्मान दाखवले.
कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध सोनिपतचा विजय यांच्यात चौथ्या क्रमांकाची कुस्ती बराच वेळ रेंगाळली. 25 व्या मिनिटाला आमदार डॉ. विनय कोरे यांनी कुस्ती निकाली करण्याची सूचना केली. त्यानंतर दोनवेळा कब्जा घेण्याच्या अटीवर लावलेल्या कुस्तीत माऊलीला विजयी घोषित करण्यात आले. वारणा दूध साखर वाहतूक शक्तीसाठी महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके विरुद्ध पंजाबचा राष्ट्रीय विजेता नवप्रीत खन्ना यांच्यात अटी-तटीची लढत होऊन शैलेश शेळके शेवटी गुणांवर विजयी झाला.
वारणा ऊस वाहतूक शक्तीसाठी कोल्हापूरचा प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब केसरी रोहित यांच्यातील कुस्ती 17 मिनिटे रेंगाळली अखेर गुणांवर लावलेल्या कुस्तीवर रोहितने सिंगल पट काढत कब्जा घेत विजय मिळविला.
पंजाबचा भाऊ फगवाडा याने बाला रफीकचा एकेरी पट काढल्यानंतर बाला रफीकने दुसर्या मिनिटात छातीचा बोजा टाकून भाऊ फगवाडाला उलटी डावावर चितपट करून वारणा बिल ट्यूब शक्ती किताब पटकावला.
वारणा शिक्षण शक्तीसाठी पुण्याचा राष्ट्रीय विजेता अक्षय शिंदे विरुद्ध बारामतीचा राष्ट्रीय विजेता भारत मदने यांच्यात वीस मिनिटे डाव-प्रतिडाव सुरू होता. अखेर गुणांवर लावलेल्या लढतीत अक्षय शिंदे विजयी झाला.
वारणा बझार शक्तीसाठी दिल्लीचा वीर गुलीया जखमी झाल्याने कर्नाटकच्या कार्तिक काटेला विजयी घोषित करण्यात आले. कर्नाटकच्या सुनील फडतरेला घिस्सा डावावर चितपट करून आंतरराष्ट्रीय विजेता संग्राम पाटीलने वारणा महिला शक्ती किताब पटकावला. वारणा नवशक्तीसाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या सुदर्शन खोतकरवर कोल्हापूरच्या शुभम सिद्धनाळेने गुणांवर विजय मिळविला. ई.डी. अँड एफ. मान शक्तीसाठी कोल्हापूरच्या सोनबा गोंगाणेला लपेट डावावर अस्मान दाखवून महेश अंथणी विजयी झाला.
वारणा अॅग्रो शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीत वारणेच्या नामदेव केसरेने हरियाणाच्या संजय कुमारला निकाली डावावर पराभूत केले. वारणेच्या उदय खांडेकरने पंजाबच्या बॉबी खन्नाचा हात काढून घिस्सा डावावर पराभव केला.
यावेळी वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे उपस्थित होते; तर निवेदन शंकर पुजारी (कोथळी) व ईश्वरा पाटील यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या मैदानात कुस्ती शौकिनांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राजू आवळे यांच्या हलगी वादनाने कुस्त्यांची रंगत अधिक वाढली.
या मैदानात शंकर पाटील यांनी डोक्यावर नारळ फोडून कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. यावेळी वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.
खुल्या गटातील विजयी मल्ल (प्रथम विजयी) : सुदेश ठाकूर (सांगली) विजयी विरुद्ध शंकर मोहिते, (पुणे), राघू ठोंबरे (शाहूपुरी) वि.वि. संदीप मोटे (सांगली), शशिकांत बोंगार्डे (शाहूपुरी) वि.वि. आशिष वावरे (पुणे), रोहन रंडे (मुरगूड) वि.वि. प्रदीप ठाकूर (सांगली), सूरज मुंडे (कोल्हापूर) वि.वि. पृथ्वीराज पवार (सांगली).
अक्षय शिंदे (शिराळा) वि.वि. मनोज कदम (सांगली), श्रीमंत भोसले (मिणचे) वि.वि. शेखर दोडके (पुणे), किरण जाधव (कोल्हापूर) वि.वि. अतुल डावरे (मोतीबाग), अनिल चव्हाण (न्यू मोतीबाग) वि.वि. संतोष पडळकर (फलटण), रामा माने (वारणा) वि.वि. मयुर पाटील (इस्लामपूर), इंद्रजित मगदूम (मोतीबाग) वि.वि. शंभुराजे पाटील (बोरगाव), प्रथमेश गुरव (वारणा) वि.वि. मोहन पाटील (कुंभी-कासारी), रणजित राजमाने (कराड) वि.वि. दत्ता बनकर (चिंचोली), ऋषीकेश देवकाते (सांगली) वि.वि. सागर सावंत (रेठरे बुद्रुक), साईराज पवार (वारणा) वि.वि. संकेत पाटील (गंगावेस), प्रतीक माने (पिंपरी) वि.वि. पवन मोरे (न्यू मोतीबाग ), सूरज पाटील (शित्तूर वारुण) वि.वि. भगतसिंग खोत (कुंभी-कासारी), सागर पवार (वारणा) वि.वि. वैभव हुबाले (कोल्हापूर), शंकर माने (वारणा) वि.वि. प्रशांत पवार (मिरज), विशाल जाधव (रेड) वि.वि. शैलेश पाटील (कुंभी-कासारी). करतार कांबळे (पेरीड) वि.वि. मंगेश माने (रहिमतपूर).