कोल्हापूर : जंगल, पाणथळ, मोकळ्या जागांवर पोल्ट्री वेस्ट; लोकांच्या आरोग्याबरोबरच संपन्न जैवविविधतेलाही धोका | पुढारी

कोल्हापूर : जंगल, पाणथळ, मोकळ्या जागांवर पोल्ट्री वेस्ट; लोकांच्या आरोग्याबरोबरच संपन्न जैवविविधतेलाही धोका

कोल्हापूर, सागर यादव : जंगल, पाणथळ, मोकळ्या जागा, घाटातील रस्ते अशा निर्जन ठिकाणी पोल्ट्री वेस्ट टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे लोकांच्या आरोग्याबरोबरच संपन्न जैवविविधतेलाही धोका निर्माण होत आहे. गोव्याला पोल्ट्रीतील कोंबड्या भरून घेऊन जायचे व परत येताना वाहतुकीदरम्यान मेलेल्या कोंबड्या तिलारी घाटात, ओढ्यात टाकायच्या हा नेहमीचाच प्रकार सुरू आहे.

तिलारी घाटात नियमित प्रकार

तिलारी घाटाच्या पायथ्याशी असणार्‍या ओढ्यात पोल्ट्री वेस्ट टाकणार्‍या पोल्ट्री वाहनधारकाला पर्यावरणप्रेमींनी नुकतेच रंगेहाथ पकडले. यावेळी पकडलेल्या वाहनात मेलेल्या कोंबड्या, स्कीन, वेस्ट असे अत्यंत दुर्गंधीयुक्त व अपायकारक टाकाऊ पदार्थ आढळले. संबंधित पोल्ट्रीवाल्यांना समज देऊन सर्व कोंबड्यांचे वेस्ट परत पोत्यात भरून गाडीतून घेऊन जा व त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावा, असे समजावत असतानाच त्यांनी बाकीच्या मृत कोंबड्या घेऊन गाडीसह तेथून पळ काढला. यापूर्वीही दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी पोल्ट्रीच्या गाड्यांना घाटातील स्वस्तिक पॉईंटजवळ रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याकडे सुमारे 25 ते 30 मृत कोंबड्या आढळल्या होत्या. या घटनेबाबत संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले होते.

विविध घाटरस्ते, जंगले, सर्वजनिक ठिकाणे, पाणथळे, ओढे, नदी-तलाव यासह वाहत्या पाण्यातही मेलेल्या कोंबड्या व पोल्ट्री वेस्ट टाकले जाते. हेच पाणी पुढे जाऊन गावांतील लोक पिण्यासाठी वापरतात. इतकेच नव्हे, तर नदीच्या पाण्यानेच हे पोल्ट्रीवाले आपली वाहने धुतात. तसेच कोंबड्यांची विष्ठा, त्यांची पिसे, मृत कोंबड्या ओढ्यात टाकतात. यामुळे आसपाच्या गावांतील लोकांच्या आरोग्याचा व स्थानिक जैवविविधतेला वारंवार धोका निर्माण होत आहे. हा प्रकार थांबावा, यासाठी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवून संबंधित यंत्रणेला निवेदनही दिले आहे; पण काही दिवसांपुरता हा प्रकार बंद होऊन पुन्हा राजरोसपणे सुरू झाला आहे.

Back to top button