Kagal : सोमय्यांना रोखल्याने तूर्त संघर्ष टळला, पण कागलमध्ये कडक बंदोबस्त | पुढारी

Kagal : सोमय्यांना रोखल्याने तूर्त संघर्ष टळला, पण कागलमध्ये कडक बंदोबस्त

कागल; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या कागल (Kagal) येथे येणार होते. मात्र, त्यांना कराड येथेच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने होणारा संघर्ष तूर्त तरी टाळला आहे. पण तरीही कागल (Kagal) बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. या चौकातच सोमय्या आल्यानंतर त्यांना अडवून जाब विचारण्याचा निर्धार हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला. त्यानंतर सोमवारी त्यांनी कागलला येणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध करून प्रत्युत्तर देण्यासाठी जय्यत तयारी केली होती.

कागलला आले तर त्यांचा आम्ही समाचार घेऊ अशी जाहीर घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे वाद अधिकच चिघळत जात होता. सोमय्या हे मुंबईमधून कोल्हापूरकडे रेल्वेमधून येत असताना मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनवरती गर्दी करून विरोध करण्याचा निर्धार केला होता. मात्र सोमय्या यांना कराडमध्येच पोलिसांनी रोखले. यामुळे कोल्हापूरला होणारा संघर्ष टळला आहे.

मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा निषेध करण्याकरिता आणि त्यांना आल्यानंतर जाब विचारण्यासाठी पंचवीस ते तीस हजार कार्यकर्ते जमा होण्याचा निर्धार केला होता.

पण आता सोमय्या येणार नसल्याने कार्यकर्त्यांनी कागलकडे येऊ नये असे आव्हान करण्यात आल्याने चौकात शुकशुकाट निर्माण झाला आहे. पण येथे पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते.

करवीर विभाग पोलीस अधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक संजय गोरले तसेच औदुंबर पाटील व इतर अधिकारी चौकामध्ये तळ ठोकून होते. पहाटेपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर लगेचच पोलीस किरीट सोमय्या यांच्यासाठी बंदोबस्तावर चौकात चौकात दाखल झाले होते.

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांना ताप आल्याने ती मुंबईतच आहेत. कागलमध्ये येणार नाहीत. मात्र त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. कागल पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा जारी केल्या आहेत.

हे ही वाचा :

Live : किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद, कराड (सातारा)

Back to top button