कोल्हापूर : वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार | पुढारी

कोल्हापूर : वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार

शित्तूर वारुण; पुढारी वृत्तसेवा :  उदगिरी (ता. शाहूवाडी) पैकी केदारलिंगवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर वाळू घेऊन जात असलेला ट्रॅक्टर (एम.एच. 10 एस 384) वळणावर घसरून 30 फूट खोल शेतात उलटला. या अपघातात आरळा (ता. शिराळा, जि. सांगली) पैकी इनामवाडी येथील ट्रॅक्टरचालक आनंदा मारुती चव्हाण (वय 38) जागीच ठार झाला. सोमवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला. घटनेची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे

आनंदा चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने इनामवाडीसह आरळा गावावर शोककळा पसरली. आरळा ते उदगिरी या मुख्य रस्त्यावरून केदारलिंगवाडीकडे जाणारा अर्ध्या किलोमीटरचा अपवाद वगळता तीन किलोमीटरचा नागमोडी वळणाचा पूर्णतः कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून गाडी चालवताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. हा अपघात म्हणजे या खडतर रस्त्याचाच बळी आहे, असे घटनास्थळावर उपस्थित नागरिकांमधून बोलले जात होते. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button