कोल्हापूर : सायबर भामट्याने दीड लाख लांबवले | पुढारी

कोल्हापूर : सायबर भामट्याने दीड लाख लांबवले

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा :  ऑनलाईन शॉपिंग करून नंतर ऑर्डर रद्द केल्यानंतर पैसे परत देतो, असे सांगून दुसरे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावयास सांगून त्या आधारे 1 लाख 53 हजार 530 रुपये लांबवल्याचा प्रकार घडला असून, पोलिसांनी राजूकुमार नामक व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद संजय शंकरराव साळुंखे (वय 56, मूळ गाव मलकापूर, सध्या रा. गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली.

साळुंखे यांनी एका अ‍ॅपवर आठ दिवसांपूर्वी ऑनलाईन खरेदी केली होती. त्यावेळी त्यांनी कार्डच्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर केले होते. दरम्यान, त्यांनी ऑर्डर रद्द केल्याने त्यांचे पैसे पुन्हा अकाऊंटला परत येणे प्रतीक्षेत होते. ऑनलाईन व्यवहाराच्या दरम्यान पाळत असणार्‍या सायबर गुन्हेगाराने साळुंखे यांना हेरून सुरुवातीला त्यांना तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटवर परत पाठवायचे असे सांगून मोबाईलमध्ये एक अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावयास सांगितले. वास्तविक या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट आपल्या मोबाईलचा संपूर्ण वापरच अन्य व्यक्तीला देण्यासारखा होतो, हे फिर्यादी साळुंखेयांच्या लक्षात आले नाही.

दरम्यान, संबंधित गुन्हेगाराने या अ‍ॅपच्या माध्यमातून साळुंखेंच्या बँक खात्यातील 49 हजार 999 दोनवेळा, तर 15 हजार 265 दोनवेळा, 10 हजार व 15 हजार असे एकूण 1 लाख 53 हजार 530 रुपये ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित फोन नंबर बंद असल्याचे आढळून आले. याबाबतची वर्दी साळुंखेयांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे.

Back to top button