कोल्हापूर : मार्केट यार्डमधील शाहू बगीचा कुलूपबंदच

कोल्हापूर : मार्केट यार्डमधील शाहू बगीचा कुलूपबंदच
Published on
Updated on

जाधववाडी; विजयसिंह पाटील :  सध्या राजर्षी शाहू स्मृती वर्षानिमित्त शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा होत आहेत. मात्र 1973 च्या दरम्यान कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने यार्डच्या मुख्य रस्त्यालगत तयार केलेला हा शाहू बगीचा गेली 48 वर्षे कुलूपबंद अवस्थेत आहे. हे निश्चितच भूषणावह नाही.

येथे राजर्षी शाहू महाराजांचा भारदस्त असा पुतळा व त्या मागे शाहू राजांच्या कल्पनेतून निर्माण झालेली राधानगरी धरणाची प्रतिकृती असलेली भिंत व या धरणाच्या दोन्ही बाजूने पाईपलाईन करून ती बगीचामध्ये फिरवली गेली आहे. या पाण्यावर कारंजे उडवण्याची शिल्पकाराची कल्पना कौतुकास्पद असल्याचे पहायला मिळते. सध्या चालू असलेली शहरासाठीच्या पाईपलाईनच्या योजनेची पायाभरणी यावेळीच झाली होती असे या कल्पकतेवरून म्हणणे उचित ठरेल. एक ते दीड एकर क्षेत्र असलेल्या या बगीचा मध्ये अत्यंत सुंदर अशी फुलझाडे, विविध आकर्षक वनस्पती, वॉकिंग ट्रॅक आहे. 1974 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. जाधववाडी परिसरातील विशेषतः शेतकरी असणार्‍या रहिवाशांसाठी विरंगुळा म्हणून एकही उद्यान नाही. मार्केट कमिटीत परगावहून येणार्‍या शेतकर्‍यांना ही आणलेली भाकरी, जेवण जेवण्यासाठी किंवा विसावण्यासाठी याचा उपयोग करता येत नाही. ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

या बगीच्याच्या देखभालीवर मार्केट कमिटी लाखो रुपये खर्च करीत असते. मात्र, या उद्यानाचा वापर शेतकर्‍यांना करता येत नाही. एरव्ही शहरांमधील अनेक प्रश्नांवर आवाज उठवणार्‍या सामाजिक संघटनांनीही याची साधी दखल घेतली नाही. या परिसरातील लोकप्रतिनिधीनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. .शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने झपाट्याने होत असलेला विकास या पार्श्वभूमीवर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या व राजर्षी शाहूंच्या स्मृती जपणार्‍या हा देखणा शाहू बगीचा गेली 48 वर्षे कुलबंद अवस्थेत ठेवणे उचित नाही. राजर्षी शाहूंचे स्मृती वर्ष म्हणून साजरे होत असताना सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष देऊन या बगीतील सुविधा, स्वच्छता याकडे लक्ष ध्यावे. तसेच हे उद्यान नागरिकांसाठी तत्काळ खुले करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news