

कोल्हापूर; पुढारी डेस्क : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 710 किलोमीटर लांबीच्या या महामार्गातील नागपूर-शिर्डी हा टप्पा 570 किलोमीटरचा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव या महामार्गाला देण्यात आले आहे. महामार्गाचा हा पहिला टप्पा खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे. प्रवासाचा तब्बल निम्मा वेळ या टप्प्यामुळे वाचणार आहे. हा एक्स्प्रेस वे भारतातील पहिला हायस्पीड हायवे आहे, हे येथे महत्त्वाचे!
विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागांच्या विकासाशिवाय समग्र विकसित महाराष्ट्राची संकल्पना यशस्वी होऊ शकत नाही, हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणले. काय करावे, या विचारात असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला थेट जोडण्याची कल्पना त्यांना सुचली. हीच समृद्धी महामार्गाची सुरुवात होती. उद्धव ठाकरेंसह अन्य नेत्यांनी या संकल्पनेला सुरुवातीला विरोध केला होता. काहींनी महामार्गाविरोधात शेतकर्यांची आंदोलनेही घडवून आणली. 'नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे' असे या प्रकल्पाचे नाव होते, त्याचे नामकरण पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे करण्यात आले.
कुणाला थेट फायदा?
10 जिल्हे / 26 तालुके / 392 गावे
प्रत्यक्षात, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या 10 जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. 26 तालुके महामार्गाद्वारे परस्परांना जोडण्यात येत असून, एकूण 392 गावांतून महामार्ग जाईल. महामार्गामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्हे एकमेकांना जोडले जातील. राज्याच्या सहा महसूल विभागांपैकी पाच विभागांतून थेट जाणार आहे, हे महत्त्वाचे.