कोल्हापूर : भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

कोपार्डे : पुढारी वृत्तसेवा : भामटे (ता. करवीर) येथील गावतळ्यात  दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. आज (दि.४) दुपारी बारा वाजता ही दुर्घटनाघडली. समर्थ महादेव पाटील (वय ८) व राजवीर महादेव पाटील (वय ६) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सागर उर्फ महादेव राजाराम पाटील हे शेती बरोबरच कुंभी कासारी साखर कारखान्याला बैलगाडीतून ऊस पुरवण्याचे काम करतात. आज सकाळी आठ वाजता ते उसाची भरलेली बैलगाडी घेऊन उस उतरण्यासाठी गेले होते. त्यांची आई जनावरे चारायला व पाणी दाखवायला गाव तळ्यावर गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर राजवीर व समर्थ ही दोन नातवंडे गेली होती. जनावरांना पाणी दाखवून आजी घरी आल्या. पण आंघोळीसाठी पाण्यात उतरलेली ही दोन मुले तिथेच थांबली. आजी घरी आल्यानंतर त्यांनी आपला दुसरा नातू अथर्व सरदार पाटील याला मुलांना घेऊन येण्यासाठी तळ्यावर पाठवले.

अथर्वला कपडे दिसली. परंतु ही मुले दिसून आली नाहीत. त्यामुळे त्याने तसे घरी येऊन सांगितले. घरातील मंडळी तळ्यावर गेली असता मुले दिसून आली नाहीत. ग्रामस्थांनी शोध घेतला असता मुले पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. त्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्‍यांचा मृत्यू झाला होता.

समर्थ इयत्ता तिसरी तर राजवीर पहिलीच्या वर्गात शिकत होता. यावेळी आईसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोघे सख्खे भाऊ एकाच वेळी पाण्यात बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button