कोल्हापूर : ‘70 साल का जमाना गया… चांगल्या आरोग्य सुविधा द्या’ : डॉ. भारती पवार | पुढारी

कोल्हापूर : ‘70 साल का जमाना गया... चांगल्या आरोग्य सुविधा द्या’ : डॉ. भारती पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शासनाकडून नागरिकांसाठी आरोग्याच्या विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. 70 साल का जमाना गया… रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्या, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी सीपीआर येथे आयोजित जिल्ह्यातील आरोग्य योजनांच्या आढावा बैठकीत अधिकार्‍यांना धारवेर धरले.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा गतिमान करा. डॉक्टर, टेक्निशियनअभावी सोनोग्राफी सेंटर बंद ठेवू नका. मुख्यालयात न थांबता आठवड्यातून किमान एक वेळ तरी डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊ सेवा दिलीच पाहिजे. कारणे सांगत बसू नका, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्ह्यात मागील वर्षी 85 कोटींचा निधी दिला आहे. यावर्षी 90 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्र शासन जिल्ह्यातील आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी देत असेल तर अंतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचवा. जिल्ह्यात आरएसबीके अंतर्गत अडीच हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. स्क्रीनिंग अंतर्गत 150 रुग्णांच्या हृदयशस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी 148 रुग्णांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झाल्या आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत 48 कोटींचा निधी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास 7 लाख लाभार्थी असून 62 रुग्णालयांतून पात्र रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले आहेत. लाभार्थ्यांनी येथे उपचार घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती दिली. यावेळी खा. धनंजय महाडिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. अजित लोकरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पी. आर. खटावकर, राजवर्धन नाईक-निंबाळकर, आरोग्य मित्र बंटी सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, खा. महाडिक यांनी सीपीआरच्या अपघात विभागाची पाहणी केली. या विभागाचे विस्तारीकरण, औषधे, अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सोयीसुविधांची माहिती मंत्री डॉ. पवार यांनी घेतली. एमआरआय उपकरणासाठी निधी दिला जाईल. रुग्णालय अद्ययावत करणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

खा. धनंजय महाडिक यांनी निक्षय मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 703 क्षय रुग्णांपैकी 500 रुग्णांचे पालकत्व घेतले आहे. त्याबद्दल त्यांचा मंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उर्वरित 656 क्षय रुग्णांना विविध संस्था, व्यक्तींनी दत्तक घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. निक्षय मित्र योजनेसाठी संघटना, तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले.

Back to top button