कोल्हापूर : 39 ठेकेदारांना नोटिसा | पुढारी

कोल्हापूर : 39 ठेकेदारांना नोटिसा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. नवीन रस्ते डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या आहेत. परंतु, वर्ष संपत आले, तरीही रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. ज्या ठेकेदारांनी वर्कऑर्डर घेऊनही कामे सुरू केलेली नाहीत, त्या 39 ठेकेदारांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

वर्कऑर्डर देऊन वर्ष उलटले, तरीही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. काहींची कामे अद्याप अपूर्ण आहेत. विलंबाबाबत आपल्यावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांत खुलासा करावा. खुलासा प्राप्त न झाल्यास आपल्याला काही सांगायचे नाही, असे समजून कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

वर्कऑर्डर घेऊन वर्ष उलटले

शहरासह उपनगरात बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, एक-दोन पावसांत तेही रस्ते खराब झाले आहेत. काही रस्त्यांवर पॅचवर्कच्या नावाखाली फक्त मोठी आणि बारीक खडी पसरलेली दिसत आहे. महापालिका इमारतीच्या अवतीभोवतीचेही रस्ते खड्डेमय झाले आहेत. गणेश उत्सवासाठी महापालिकेने टेंडर काढून 90 लाखांचे पॅचवर्क करून घेतले. परंतु, त्यानंतर झालेल्या पावसात तेही धुवून गेले आहेत.

खड्ड्यांमुळे शहरवासीयांचे प्रचंड हाल

कोल्हापूर रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने महापालिकेने नवीन रस्त्यांसाठी आणि पॅचवर्कसाठी टेंडर काढले होते. निविदा काढून ती कामे ठेकेदारांना देण्यात आली आहेत. परंतु, काही ठेकेदारांनी वर्कऑर्डर घेऊन वर्ष उलटले तरीही अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. कामे घेऊन ठेकेदार निवांत आहेत; मात्र रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरवासीयांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

नोटिसा बजावलेले ठेकेदार

1) बबन पोवार, 2) मे. निर्माण कन्स्ट्रक्शन, अरुण पाटील. 3) मे. कॉसमॉस इन्फ्रा, शाम चंदवाणी, 4) मे. फन पार्क असो., आशपाक आजरेकर, 5) वीरअभिमन्यू रासम, 6) एस. ओ. कन्स्ट्रक्शन, सुरेश कोलेकर, 7) आशिष विश्वास मोटे, 8) घुमाई असो., सुकुमार घुमाई, 9) मे. रेणुका कन्स्ट्रक्शन, शशिकांत पोवार, 10) मे. नृसिंह कन्स्ट्रक्शन, राजेश व्हटकर, 11) अमित पोवार, 12) लक्ष्मीकांत शहाणे, 13) प्रवीण सोहनी, 14) अभिजित कुंभार, 15) सचिन कोकाटे, 16) स्वप्निल कांबळे, 17) रोहित माने, 18) समरजित पाटील, 19) चंद्रकांत चौगुले, 20) अमितकुमार पाटील, 21) सचिन चंद्रकांत सोहनी, 22) विजयकुमार, 23) दिगंबर वांद्रे, 24) आशिष मांडवकर, 25) विजय, 26) अविनाश पाटील, 27) शिवाजी देवणे, 28) रोहित करपे, 29) दुर्गा पाटील, 30) अमित साळोखे, 31) रणजित कुंभार, 32) अनिल पाटील, 33) जी.पी.सी. कन्स्ट्र. गोविंद चौगुले, 34) मे. लक्ष्मीनारायन कन्स्ट्रक्शन, 35) निखील सनगर, 36) राजवर्धन उ. जाधव, 37) संगीता कन्स्ट्रक्शन प्रोप्रा. गणेश खाडे, 38) श्रीप्रसाद वराळे, 39) पृथ्वीराज देसाई.

Back to top button