

कोल्हापूर; एकनाथ नाईक : जनजागृती, समुपदेशन आणि औषधांच्या नियमित सेवनामुळे एचआयव्ही, एड्स या जीवघेण्या आजाराचे प्रमाण जिल्ह्यात दिवसेंदिवस घटत आहे. गेल्या दहा वर्षांतील एचआयव्ही संसर्गाचा आढावा घेतल्यास ५.१ टक्क्यांवरून ०.०४ टक्यांवर हे प्रमाण आले आहे. जिल्ह्यात एकूण २६, ६१४ जण या रोगाने बाधित झालेले रुग्ण आहेत. त्यापैकी ९४९ गरोदर मातांना एड्सची लागण झाली. सन २०२१-२२ मध्ये २३, तर २०२२- २३ मध्ये १६ एचआयव्हीबाधित महिला आढळल्या आहेत.
यंदा जानेवारी ते नोव्हेंबर अखेर ३८२ एड्सबाधित रुग्ण आढळले असून, यामध्ये १६ गरोदर मातांचा समावेश आहे. या आजाराच्या संसर्गाची नोंद जिल्हा एड्स प्रतिबंधक कार्यालयाकडे झाली आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक औषधोपचारामुळे एचआयव्ही संसर्गित मातांकडून बाळाला संसर्ग होण्याचा धोका कमी झालेला आहे. जिल्ह्यात २००७ ते २०१७ या दरम्यान एचआयव्हीचे प्रमाण अधिक होते. याचा विचार करून आरोग्य विभागाने एचआयव्ही एड्स आजार व प्रबोधन यावर लक्ष केंद्रित केले. स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालये, स्थलांतरित ठिकाणे, औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी प्रभावीपणे प्रबोधन केले.
जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या २२ एआरटी सेंटरमुळे हे प्रमाण कमी झाले, नंतर मात्र या आजारावर प्रभावी औषध निघाले. अॅटिरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) प्रभावी औषध एचआयव्ही रुग्णांसाठी उपयुक्त ठरले. पुण्यानंतर एआरटीची सुरुवात सांगली व कोल्हापुरात झाली. सीडी ४ काऊंट करण्याचे मशिनदेखील येथे उपलब्ध झाले आहे. ९२ पी.पी.पी. (पब्लिक प्रायव्हेटशिप) येथेही रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध केल्याने तालुक्याच्या ठिकाणीदेखील ही औषधे मिळतात.
जिल्ह्यात एड्स प्रतिबंध व नियंत्रण प्रकल्प अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, राज्य एड्स नियंत्रण पथकाने प्रभावी जनजागृती करण्यावर भर दिला. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना यांच्या सहकार्यातून जिल्ह्यात पथनाट्याद्वारे प्रबोधन, व्याख्याने आणि समुपदेशन आदी कार्यक्रम प्रभावी राबविले. जिल्ह्यातून एचआयव्ही एड्स आजाराचे उच्चाटन करण्याचा संकल्प छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्ह्यात आरोग्य विभागाने केल्याचे शिपूरकर यांनी सांगितले.