कोल्हापूर : सर्वेक्षण करणारे घरात... साथीचा उद्रेक गावागावांत | पुढारी

कोल्हापूर : सर्वेक्षण करणारे घरात... साथीचा उद्रेक गावागावांत

कोल्हापूर; विकास कांबळे :  प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण होत नसल्याचे आरोग्य सहसंचालकांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पाठविलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. मे महिन्यापासून जिल्ह्यात विविध गावांमध्ये आठवेळा साथीचा उद्रेक झाला आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांनी सर्वेक्षण व्यवस्थित केले असते, तर साथीच्या घटना निश्चित टाळता आल्या असत्या. सर्वेक्षणाच्या कामात टाळाटाळ करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवर व संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य सहसंचालकांनी (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) दिल्या आहेत.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाला फार महत्त्व आहे. यावरून साथीची कल्पना येऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाते. आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत हे सर्वेक्षण केले जाते. पूर्वी ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी आरोग्य कर्मचारी फिरताना दिसत होते. परंतु, अलीकडे टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांडून येत असतात. त्यामुळे खरी माहिती मिळू शकत नाही. त्याचा परिणाम जिल्ह्यात जलजन्य साथीचा उद्रेक झाला.

यासंदर्भात आरोग्य सहसंचालकांनी जिल्ह्यातील आरेाग्य विभागाच्या अधिकार्‍यांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन माहिती घेतली. 2022 मध्ये एकूण आठवेळा साथीचे उद्रेक झाले असून मे महिन्यापासून अतिसार, गॅस्ट्रो, कॉलराच्या साथीचे आठ उद्रेक झाले. यामध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यावर सर्वेक्षण व्यवस्थित करण्याच्या सूचना देत सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

कामात कसूर करणार्‍यांवर कारवाईच्या सूचना

जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजारांचा उद्रेक होत असतानासुद्धा आरोग्य कर्मचार्‍यांनी एकही गाव 10 टक्क्यांपेक्षा अधिक सर्वेक्षण होत नसल्याचे दिसते, ही बाब निश्चितच गंभीर आहे. आरोग्य कर्मचार्‍यांनी केलेले सर्वेक्षण अजिबात गुणात्मक होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या कामात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

…तरच साथीचा उद्रेक टाळण्यास मदत

यापुढे अहवाल सादर करताना सर्वेक्षणवेळी जी निरीक्षणे आढळून येतील तेच अहवालामध्ये नमूद करावे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील अहवालाची पडताळणी करूनच अहवाल या कार्यालयास सादर करावे, असेही आरोग्य सहसंचालक डॉ. बी. एस. कमलापूरकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Back to top button