दोन्ही काँग्रेसचे बालेकिल्ले येत्या निवडणुकीत हलतील : राज ठाकरे | पुढारी

दोन्ही काँग्रेसचे बालेकिल्ले येत्या निवडणुकीत हलतील : राज ठाकरे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही पक्षाने पश्चिम महाराष्ट्र बालेकिल्ला आहे, असे समजू नये. राजकारणात बालेकिल्लेही हलत असतात. 1995 च्या निवडणुकीतही तो हलला होता. येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांतही दोन्ही काँग्रेसवाल्यांचा, साखरसम्राटांचा हा बालेकिल्ला आपण हलवू, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. मंगळवारी सायंकाळी या दौर्‍यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह आगामी प्रत्येक निवडणुकीत आमची ताकद दाखवू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केल्याने ठाकरे परिवारातही अस्वस्थता आहे? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, प्रश्न मिमिक्रीचा नाही; कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाला भेटले नाहीत. आरोग्याची, सोशल डिस्टन्सची कारणे सांगून ते लोकांना भेटणे टाळत होते. मुख्यमंत्रिपद जाताच ते फिरायला बाहेर पडले आहेत. प्रत्येकाचे आरोग्य सुधारलेच पाहिजे. त्यामध्ये दुमत असायचे कारण नाही. परंतु, प्रश्न आरोग्याचा नाही; प्रश्न लोकांना टाळण्याच्या प्रवृत्तीचा होता. त्यामुळेच मी टीका केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठेच लागली तरी राज ठाकरे विश्रांती घेतात, या खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, असल्या दगडांमुळेच आपल्याला ठेचा लागल्या आहेत.

सीमा प्रश्न मध्येच कसा उफाळून येतो?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून पुन्हा सुरू असलेल्या वादासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय योग्य तो निर्णय देईलच; पण हा वाद मध्येच कसा उफाळून येतो? महाराष्ट्रात शेकडो प्रश्न आहेत. त्यावर चर्चा, बैठका करायचे सोडून असले वाद जाणीवपूर्वक उकरून काढले जात आहेत. मूळ प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असले उद्योग केले जात आहेत. सवंग प्रसिद्धी मिळावी, यासाठीही काही जण वादग्रस्त विधाने करत आहेत.

मुंबई मनपा निवडणूक स्वबळावर लढवू

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्याविरोधातही महाराष्ट्रात संताप असल्याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता, ठाकरे म्हणाले, कोश्यारींना राज्यपालपद मिळाले आहे, काय बोलायचे याची स्क्रिप्ट कोश्यारींना कोठून येते का? हे पाहावे लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करताना ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन 16 वर्षे झाली. स्वतंत्र पक्ष म्हणून आमचे काम आहे.

प्रत्येक निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत असतो. प्रत्येक गोष्ट माध्यमांना सांगूनच करावी, असे काही नाही. रणनीती कोण कोणाला सांगत नसते. आमच्या पक्षाचे काम नेहमीच सुरू असते. मुंबई महापालिकेची येणारी निवडणूकही आम्ही स्वत:च्या ताकदीवर स्वतंत्रपणे लढणार आहोत, 1952 साली स्थापन झालेल्या भाजपला 2014 ला यश मिळाले; तर 1966 ला स्थापन झालेली शिवसेना मुंबईत 1985 ला सत्तेत आली. त्यामुळे आमच्या पक्षालाही यश मिळेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

Back to top button