

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गतही कर्जपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ होते. या योजनेंतर्गत उत्पादन व सेवा या दोन क्षेत्रांतील उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषिपूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, वाहतूक सेवा यामधील रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या नवीन संधींचा विचार केला आहे. यातून वित्तपुरवठा करण्यासाठी यापूर्वी सरकारी बँका तसेच खासगी क्षेत्रातील शेड्युल्ड बँकांचा समावेश होता. यामध्ये आता नव्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश झाला आहे. जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांना नाबार्डच्या 'बहुउद्देशीय सेवा केंद्र' या योजनेतील गुंतवणुकीचा फायदा मिळावा म्हणून धोरणात शिथिलता करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विकास संस्थांना स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी खा. संजय मंडलिक, आ. राजेश पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदी उपस्थित होते.
असा होणार कर्जपुरवठा
पाच ते सात वर्षांच्या मुदतीने या योजनेत कर्ज व खेळत्या भांडवलासह 40 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के, अनुसूचित जाती-जमातीसह महिला, अपंग, माजी सैनिकांसाठी शहरी भागात 25 टक्के तर ग्रामीण भागात 35 टक्के अनुदान मिळणार आहे.
योजनेची उद्दिष्टे
* वैयक्तिक उद्योगांची पत मर्यादा वाढवणे.
* उत्पादनांच्या ब्रँडिंग व विपणनासह त्यांना संघटित पुरवठा साखळीशी जोडणे.
* सामूहिक सेवा तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे.