कोल्हापूर : महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्राचा लवकरच श्रीगणेशा - पुढारी

कोल्हापूर : महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्राचा लवकरच श्रीगणेशा

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : शिवाजी विद्यापीठ संलग्नित पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयांच्या नवीन शैक्षणिक सत्राचा ‘श्रीगणेशा’ ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. मात्र, महाविद्यालये ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बंद महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 2 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे.

विद्यापीठाने पदवी-पदव्युत्तर सत्रारंभ व सत्र समाप्तीच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार विविध अभ्यासक्रमांचा 1 ऑक्टोबरपासून प्रथम सत्रारंभ होणार आहे.

सध्या बीए.,बी.कॉम., बी.एस्सी. प्रथम वर्षाची महाविद्यालयस्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठ, महाविद्यालयातील पदव्युतर अधिविभागाच्या प्रवेशासाठीच्या 29 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा झाल्या आहेत. लवकरच गुणवत्ता यादी जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रवेश सुरु होतील.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने 15 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून 15 सप्टेंबरपासून परीक्षांना प्रारंभ झाला आहे. यात प्रथम वर्षाच्या सुमारे 80 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 10 तारखेपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा चालतील. त्यानंतर प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.

विद्यापीठ कार्यक्षेत्रात 276 महाविद्यालये असून विद्यार्थी संख्या 2 लाख 40 हजार आहे. अनुदानित पारंपारिक (126), व्यावसायिक (15) महाविद्यालये आहेत. विनाअनुदानित पारंपारिक (61), व्यावसायिक (77) महाविद्यालये आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व आर्किटेक्चरची 21 महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात समाविष्ट झाली आहेत.

विद्यापीठाने सांगली, सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करुन विद्यार्थी वसतीगृह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानुसार काही वसतीगृहे ताब्यात दिली आहेत. विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या लसीकरणाबाबत महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.

महाविद्यालये सुरू करण्याबाबत नियोजन सुरू झाले आहे. यूजीसी व राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक सत्रास प्रारंभ होईल. व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये सीईटी परीक्षा झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये सुरू होतील.
– डॉ. डी.टी.शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून काही गोष्टी स्पष्ट नाहीत. गेल्या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिकांचे कामकाज समाधानकारक झालेले नाही. शासनाने सर्व नियमांच्या अधिन राहून ऑफलाईन महाविद्यालये सुरू केल्यास बरेच प्रश्न सुटतील.
– डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य, विवेकानंद कॉलेज

Back to top button