कोल्हापूर : ग्रा. पं. निवडणुकीसाठी आजपासून धुमशान सुरू; राजकीय गट-तटांची ईर्ष्या शिगेला | पुढारी

कोल्हापूर : ग्रा. पं. निवडणुकीसाठी आजपासून धुमशान सुरू; राजकीय गट-तटांची ईर्ष्या शिगेला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सोमवारपासून (दि. 28) सुरू होत आहे. गावागावांत गटातटांतील ईर्ष्या आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 12 हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. या अर्जासोबत जातीचा दाखला, शौचालय असल्याच्या दाखल्यासह दहा प्रकारचे दाखले जोडावे लागणार आहेत. हे दाखले जमविताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे गटातटाच्या राजकारणाला उकळी फुटली आहे. 18 डिसेंबरला मतदान आणि 20 रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणार्‍या या निवडणुकीत आगामी निवडणुकीची पेरणी होणार आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील 475 गावांमध्ये या निवडणुकीचे धुमशान सुरु होणार आहे. इच्छूकांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. त्याचबरोबर ऑफलाईनही अर्ज निवडणूक कार्यालयात सादर करवा लागणार आहे. नुसता ऑनलाईन अर्ज भरला तर ग्राह्य मानला जाणार नाही.

सरपंचपदासाठी व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्यासोबत अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. अर्जासोबत तीन फोटो, जातवैधता प्रमाणपत्र, अनामत रक्कम भरलेली पावती, गुन्हेगारी पार्‍श्वभूमी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, वय 21 वर्ष पूर्ण असल्याचा दाखला, ग्रामपंचायतीची थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालयाचा दाखल, 12 सप्टेंबर 2001 नंतरच्या अपत्यांसह संख्या दोन पेक्षा अधिक नसावी. राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकेत नवीन खाते व त्या पासबुकाची झेरॉक्स असे कागपत्रे जोडावी लागणार आहेत. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी सातवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडावाच लागणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याचे ठिकाण

या निवडणुकीसाठी ज्या त्या तालुक्यात तहसीलदार कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. तर करवीर तालुक्यासाठी रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पाच ते सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मोठी चुरस

या निवडणुकीत जिल्ह्यातील वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा, उजळाईवाडी, गांधीनगरसह जिल्ह्यातील सुमारे 100 पेक्षा अधिक मोठ्या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निमित्ताने त्या त्या विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार आमने-सामने येणार आहेत. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असून त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावयाची यासाठी गावातील नेत्यांचा चांगलाच कस लागत आहे. यासाठी गावातील नेत्यांच्या चर्चा, बैठकांचा जोर वाढू लागला आहे.

Back to top button