कोल्हापूर : निनावी फोन अन् अंबाबाई मंदिर क्षणात बंद | पुढारी

कोल्हापूर : निनावी फोन अन् अंबाबाई मंदिर क्षणात बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सायंकाळी पाचची वेळ… रविवार सुट्टीमुळे अंबाबाई मंदिरात गर्दी… लग्नसराईमुळे नवविवाहित जोडप्यांची दर्शनासाठी रीघ… तेवढ्यात मंदिर परिसरात संशयास्पद वस्तू असल्याचा फोन खणाणला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. अवघ्या काही मिनिटांत बॉम्बशोधक व नाशक पथक, डॉग स्कॉड दाखल झाले. चारही दरवाजांतून येणार्‍या भाविकांना थांबविण्यात आले. काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र मंदिर सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून सराव कवायत (मॉकड्रिल) असल्याचे पोलिसांनी स्पष्ट करताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने काळपासूनच मंदिरात गर्दी होती. सायंकाळच्या सुमारास मंदिरात संशयास्पद वस्तू असल्याचा कॉल पोलिस कंट्रोल रुममध्ये आला. याची माहिती जुना राजवाडा पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक, डॉक स्कॉड पथकाला देण्यात आली. काही मिनीटातच दोन्ही पथके मंदिरात पोहोचली. मेटल डीटेक्टर, प्रशिक्षित श्वानासह तपासणी सुरु करण्यात आली.

दर्शन थांबवले….

तपासणी पथके मंदिरात आल्यानंतर महाद्वार, घाटी दरवाजा, दक्षिण दरवाजा, मुख्य दर्शन रांगेतील भाविकांना थांबविण्यात आले. प्रवेशद्वारावरील गर्दी वाढल्याने भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच मंदिर आवारातील भाविकांनाही जागच्या जागी थांबवून श्वानाकडून तपासणी सुरु करण्यात आली.

गाभारा, मंदिरे, स्टॉलची तपासणी…

श्वान पथकाने मंदिरातील सर्व विक्रेत्यांचे स्टॉल, कचरा पेट्या, आतील मंदिरे तपासण्यात आली. अंबाबाई मंदिर गाभारा, गरुड मंडप, संरक्षक भिंतीबाहेरील स्टॉल्सची तपासणी करण्यात आली.

सराव कवायत (मॉक ड्रील)….

मंदिर सुरक्षिततेदृष्टीने सराव कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस कंट्रोल रुमकडून संबधित सुरक्षा यंत्रणेतील कर्मचार्‍यांना कॉलद्वारे माहिती देण्यात आली. मात्र, कर्मचार्‍यांनी गांभीर्याने या कॉलची दखल घेत मंदिराची तपासणी केल्याचे वरीष्ठ पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

Back to top button