कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणूक : परडी, लिंबू अन् जागोजागी उतारे | पुढारी

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणूक : परडी, लिंबू अन् जागोजागी उतारे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण आता तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांच्या दारासमोर लिंबू, बिबे, परडी आणि उतारे ठेवण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे.

जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत आहे. पूर्वी सदस्यांमधून सरपंच निवड केली जायची; परंतु नव्या सरकारने पुन्हा थेट जनतेतून सरपंचांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत साम, दाम, दंड नीतीचा वापर केला जातो. विरोधी उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी करणी, भानामती यासारख्या गोष्टींवरही विश्वास ठेवत कोणत्यातरी भोंदूबाबाने सांगितल्याप्रमाणे उतारे ठेवले जातात. केवळ ग्रामीण भागातच हे प्रकार घडत असतात असे नाही तर शहरातदेखील असे प्रकार निवडणुकीवेळी पाहावयास मिळत असतात.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त भाऊबंदकीदेखील जोरात उफाळून आली आहे. एक भाऊ एका गटाकडे गेला की, दुसरा विरोधी गटात जाऊन बसतो. त्यामुळे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहू लागतात. उतारे, लिंबू, परडी असले प्रकार सुरू होतात. निवडणुकीमुळे आता गावागावांत या प्रकाराला ऊत आला आहे. काळा दोरा, टाचण्या, बिबा, सुया, चमड्याची चप्पल, काळी बाहुली, बांगड्या अशा वस्तू एकमेकांच्या दारासमोर ठेवण्यात येऊ लागल्या आहेत.

त्याच प्रमाणे भात, मटण, अंडी, त्यावर गुलाल, हळद, कुंकू लावलेल्या परड्याही आता गावात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. यामुळे गावात सध्या तो चर्चेचा विषय आहे.

अतिक्रमणधारकांनो सावधान! …तर ग्रा. पं. निवडणुकीसाठी अपात्र?

हातकणंगले, पोपटराव वाकसे : सर्वोच्च न्यायालयाने दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी गायरान अतिक्रमण हटविण्याबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरताना ग्रामसेवकाकडून अतिक्रमण नसल्याचे प्रतिज्ञापत्र जोडावे लागणार आहे. वर्षभर कंबर कसून निवडणुकीची तयारी करणार्‍या इच्छुकांना अतिक्रमणांचा फटका बसणार काय, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे इच्छुकांपासून गटनेत्यांपर्यंत प्रत्येकाचे धाबे दणाणले आहेत.

हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय ज्वर चढला आहे. परंतु, न्यायालयाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक इच्छुक उमेदवारांना धडकी भरली आहे. अर्ज भरावे की नको, या संभ्रमावस्थेत अनेक जण आहेत.

हातकणंगले तालुक्यामधील आळते, चावरे, हिंगणगाव, कासारवाडी, मुडशिंगी, निलेवाडी, साजणी, टोप, यळगूड, शिरोली, घुणकी, लक्ष्मीवाडी, नवे पारगाव, भादोले, रांगोळी, रेंदाळ, संभापूर, अंबप, अंबपवाडी, अतिग्रे, भेंडवडे, मजले, मौजे वडगाव, तळसंदे, तारदाळ, इंगळी. जुने पारगाव, कोरोची, तळदंगे, सावर्डे, नागाव, नरंदे, पट्टणकोडोली, रुकडी, चोकाक, माले, हेर्ले, कापूरवाडी, खोतवाडी या गावांत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरावयाचे असल्याने थकबाकीसह सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उमेदवारी अर्ज अपडेट करण्यासाठी सर्वांचीच दमछाक होत आहे. ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार असल्याने नेतेही सक्रिय झाले आहेत.

इच्छुकांना सर्व्हर डाऊनचा फटका

कुरूंदवाड, जमीर पठाण : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राचे टोकन आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्जही ऑनलाईन सादर करण्याचा आहे; मात्र या ऑनलाईन प्रक्रियेत सर्व्हर डाऊनचा फटका उमेदवारांना बसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया बंद करून ऑफलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज घ्यावेत, अशी मागणी इच्छुक उमेदवारांतून होत आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांना जातीचा दाखला आवश्यक आहे. निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्याने दाखला काढण्यासाठी धावपळ उडाली आहे. जातीचा दाखला काढण्यासाठी व जात पडताळणीचे टोकन मिळवण्यासाठी शासनाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करायला सुरुवात झाली आहे. याला अत्यंत अवधी कमी आहे. त्यामुळे शासनाने ही ऑनलाईन प्रक्रिया बंद करून समितीने ऑफलाईन प्रस्ताव सादर करून घेऊन टोकन म्हणून प्रस्तावाची पोहोच दिली, तर उमेदवारांना सोयीस्कर होणार आहे.

Back to top button