कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर ते पन्हाळा आणि पुढे कोकणात जाण्यासाठी शहरातील शिवाजी पूल हा महत्त्वाचा मार्ग आहे. सुमारे 140 वर्षे या पुलाने वाहतुकीचा भार सोसला. आता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परंतु, या पुलाचा हेरिटेज वास्तूमध्ये समावेश आहे. त्यामुळे शिवाजी पुलाचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने 13 कोटींचा आराखडा तयार केला आहे. पालकमंत्री दीपक केसकर यांनी पुलाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
शिवाजी पुलाचा हेरिटेज वास्तूंच्या यादीत समावेश आहे. त्यामुळे या पुलाच्या जतन आणि संवर्धनासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यानुसार महापालिकेने आराखडा तयार केला आहे. जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी एकत्रित आराखडा आहे. जिल्हा नियोजन समितीमधून त्यासाठी निधी दिला जाणार आहे. परंतु, एकदम एवढा निधी मिळणे अशक्य असल्याने पहिल्या टप्प्यात सुमारे दोन कोटी रुपये निधीतून सुशोभीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
23 ऑक्टोबर 1871 रोजी करवीर राज्याची धुरा छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांच्या हाती आली. 1871 ते 1883 अशी त्यांची कारकीर्द होती. त्यांनी आपल्या राज्यात त्यावेळी लोकोपयोगी बांधकामे केली. यात टाऊन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सीपीआर) आणि पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक शिवाजी पुलाचा समावेश आहे. वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तत्कालीन कोल्हापूर दरबारने पंचगंगा नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या बांधकामाला 1874 मध्ये सुरुवात झाली. या कामावर आर्किटेक्ट म्हणून छत्रपतींच्या दरबारने मेजर वॉल्टर डकेट यांची नियुक्ती केली होती. पूल बांधण्यासाठीचा सर्व खर्च छत्रपतींच्या दरबारातून करण्यात आला होता.
1878 मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाला. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांच्या सन्मानार्थ या पुलाला शिवाजी पूल असे नाव त्याच कालावधीत देण्यात आले.
असे होणार सुशोभीकरण…
* लाईट वेट स्ट्रक्चरल
* ऐतिहासिक शस्त्रांची प्रतिकृती
* संकल्पित चित्रे
* डिजिटल पाण्याचा पडदा
* पंचगंगा घाटाचा व्ह्यू
* ऐतिहासिक कलाकृतींचे संग्रहालय
* आधुनिक लाईट इफेक्ट
* लक्झरी फाईन डायनिंग
* बैठक व्यवस्था
* कोल्हापुरी वैशिष्ट्यांची झलक