कोल्हापूर : अनाथांसाठी अठरावं वरीस ठरतंय धोक्याचं! | पुढारी

कोल्हापूर : अनाथांसाठी अठरावं वरीस ठरतंय धोक्याचं!

कोल्हापूर, पूनम देशमुख : अठराव्या वर्षात पदार्पण करतानाच व्यक्तीला मतदानाचा हक्क, वाहन चालविण्याचा परवाना आणि कायदेशीर अधिकार मिळतात. बालगृहातील अनाथांना मात्र अठरावे वर्ष काहीसे धोक्याचे वाटते. त्यामुळे अठरावा वाढदिवसही त्यांना नकोसा होतो. कारण, वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशी डोक्यावरील छत्र हरपते अन् दोन वेळच्या जेवणासाठी आणि हक्काच्या निवार्‍यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होतो.

काहींनाच अनुरक्षणगृहात (आफ्टर केअर सेंटर) प्रवेश मिळतो. अन्य शेकडो बालके अक्षरश: रस्त्यावर येत आहेत. यामुळे अठरा वर्षांपुढील मुला-मुलींसाठीच्या अनुरक्षणगृहांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

शून्य ते अठरा वर्षांपर्यंत अनाथांना अनाथाश्रम आणि बालगृहात दाखल केले जाते. मुलांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही या माध्यमातून होते. मात्र, अठरा वर्षांनंतर मुलांना बालगृह सोडणे बंधनकारक आहे. पोटभर अन्न, अंगभर कपडा, घराची ऊब, पाठीवरून मायेचा हात अन् गेली अनेक वर्षे सुख-दु:खात साथ देणारे सवंगडी या सगळ्यांचा हात सोडून डोक्यावर छत शोधण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होतो.

अनुरक्षणगृहांची गरज

राज्यातील अनुरक्षणगृहांची संख्या कमी आहे. वयाच्या 21 वर्षांपर्यंत मुलांची या अनुरक्षणगृहांत राहण्याची व्यवस्था केली जाते. काही ठरावीक वेळी वयाची अट 23 वर्षांपर्यंत पुढे ढकलली जाते; मात्र त्यानंतर अनुरक्षणगृहदेखील सोडणे बंधनकारक असते. जोपर्यंत मुले स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत तोपर्यंत अनुरक्षणगृहातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींसाठीही काहीतरी ठोस व्यवस्था किंवा धोरण राबविण्याची आवश्यकता आहे.

Back to top button