कामाख्या देवी कडक; विरोधकांनी जपून बोलावे : मुख्यमंत्र्यांचा इशारा | पुढारी

कामाख्या देवी कडक; विरोधकांनी जपून बोलावे : मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई/गुवाहाटी : पुढारी वृत्तसेवा : आम्ही चार महिन्यांपूर्वी गुवाहाटीला गेलो तेव्हा कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. तेथून परतलो आणि आम्ही राज्यात सत्तेवर आलो. आमची श्रद्धा आहे. कामाख्या देवी हे कडक आणि जागृत देवस्थान आहे, त्यामुळे विरोधकांनी या दौर्‍यावर टीका करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी गुवाहाटीला निघण्यापूर्वी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समर्थक आमदारांसह गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर कर; शेतकरी, कामगारांचे कल्याण कर, असे साकडे त्यांनी घातले.

कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो, असा संदर्भ देत विरोधकांनी या दौर्‍यावर टीका केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ते जागृत देवस्थान आहे. त्यामुळे विरोधकांनी यावर टीका करू नये. दरम्यान, कामाख्या देवीच्या कृपेने महाराष्ट्रावरची सगळी संकटे दूर व्हावीत, शेतकरी आणि कामगारांच्या आयुष्यात भरभराट यावी, ही प्रार्थना मी मंदिरात केली, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरातील दर्शनानंतर व्यक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या स्वागतासाठी तीन मंत्री पाठवले होते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आणि आसाम सरकारला मी धन्यवाद देतो, असेही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे कुटुंबीयांसह 150 जणांसोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी चार्टर्ड विमानाने गुवाहाटीत पोहोचले. चार महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे गुवाहाटीला आले होते. गुवाहाटीहून गोव्याकडे रवाना होताना तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. नंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार, असे शिंदे यांनी सांगितले होते.

सामंतांच्या वक्तव्याने होती उत्सुकता

परतताना आणखी आमदार सोबत घेऊन येऊ, असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते. त्यामुळे शिंदे गट या नव्या गुवाहाटी दौर्‍यात ठाकरे गटाला आणखी धक्का देणार का, याकडे राज्याचे लक्ष लागून होते; पण तसे कुठलेही संकेत शनिवारी सायंकाळपर्यंत मिळाले नाहीत. अर्थात, गेल्यावेळी आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या, असे निमंत्रण आम्हाला दिले होते. त्यासाठी व दर्शनासाठी जात आहोत. दुसरे-तिसरे यात काही नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यानंतर स्पष्ट केले होते.

Back to top button