पहिल्या टप्प्यात वारणा, राजाराम कारखान्यांची निवडणूक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून (दि. 20) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 624 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ज्या संस्थांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशा संस्था वगळून उर्वरित संस्थांची 31 ऑगस्ट 2021 या अर्हता दिनांकावर मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वारणा, राजाराम, डी. वाय. पाटील, शरद आणि दत्त-आसुर्ले हे साखर कारखाने, तर 7 सूतगिरण्या, तसेच सरकारी कर्मचार्‍यांची जिव्हाळ्याची असलेल्या गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेची निवडणूक होणार आहेत.

संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने आराखडा तयार केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डिसेंबर 2021 अखेर मुदत संपणार्‍या विविध गटांतील 5,965 संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत; पण त्या अगोदर ज्यांच्या मुदती संपल्या आहेत, त्या संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 624 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

एकूण सहा टप्प्यांत जिल्ह्यातील 4,200 संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात ज्या ज्या संस्थांच्या संचालक मंडळाच्या मुदती संपणार तशा निवडणुका घेण्याचे नियोजन सहकार निवडणूक प्राधिकरणाने केले आहे.

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरातील 16 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात अंगणवाडी सेविका पतसंस्था, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खाते सेवक पत संस्थेसह अन्य संस्था आहेत. यातील 8 पतसंस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र दाखल करण्यापर्यंत प्रक्रिया गेली होती; पण कोरोनासाथीमुळे पुढील प्रक्रिया थांबली आहे. आता या 8 संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया माघारीच्या पुढील टप्प्यापासून सुरू होईल.

ब गटातील सेवा संस्था विभागात निवडणुकीसाठी मोठी चुरस असते. यातून गावागावांत टोकाची ईर्ष्या दिसून येत असते. पहिल्या टप्प्यात या गटातील जिल्ह्यातील 220 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यांची तालुक्यांतील आकडेवारी अशी ः आजरा 12, शाहूवाडी 12, कागल 46, गगनबावडा 11, पन्हाळा 31, भुदरगड 8, करवीर 8, हातकणंगले 13, गडहिंग्लज 2, चंदगड 18, शिरोळ 27, राधानगरी 29, कोल्हापूर शहर 16.

क गटात 190 दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था, ड गटात 199 मजूर संस्था, हौसिंग सोसायट्या आदींचा समावेश आहे.

सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत तालुक्यातील सहायक निबंधकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानंतर 'राजाराम'ची निवडणूक

पहिल्या टप्प्यात कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होणार आहे; पण या कारखान्याच्या मतदार यादीबाबत न्यायालयात प्रकरण असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर या कारखान्याची निवडणूक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news