कोल्हापूर : जिल्ह्यात निर्भया पथकांचा धाक संपला! | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात निर्भया पथकांचा धाक संपला!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शहरालगतचा पाचगाव, मोरेवाडी, शेंडापार्क, राजेंद्रनगर हा उपनगरांचा भाग मोठ्याप्रमाणात विकसित झाला. उच्चभ्रू लोकवस्ती या भागात वाढू लागली. शाळेला जाणार्‍या मुली, महिला, पालक यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आहे.

भागातील वाढत्या गुन्हेगारीची अनेक उदाहरणे समोर येत असून निर्भया पथकाकडून नियमित कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे. रोडरोमिओंना धडा शिकविण्यासाठी बनविण्यात आलेल्या या पथकांचा धाक संपला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षांत या पथकांची ही कामगिरी जोरदार सुरू असली, तरी छेडछाडीचे प्रकार रोखण्यात म्हणावे तितके यश आल्याचे दिसत नाही.

निर्जनस्थळी गस्त

शहरालगतच्या निर्जनस्थळी प्रेमीयुगुलांचा वावर असतो. अशा प्रेमीयुगुलांना लुटणारी टोळकीही तितकीच नव्याने तयार होतात. कात्यायनी, गिरोली, मोरेवाडी, पन्हाळा रोड, वाघबीळ रस्ता, हातकणंगले अशा ठिकाणी प्रेमीयुगुलांना लुटीचे प्रकार घडले आहेत. हत्यारे घेऊन फिरणार्‍या अशा गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी निर्जनस्थळी निर्भया पथकांनी नियमित भेट देऊन कारवाईची गरज आहे.

मदतीसाठी तत्काळ करा कॉल

पोलिसांची नवी ‘डायल 112’ प्रणाली सध्या कार्यान्वित आहे. या क्रमांकावर कॉल करताच लोकेशन पाहून पोलिस मदत काही मिनिटांत मिळू शकते. (समाप्त)

राजेंद्रनगरसह ज्या ठिकाणी हाणमारीचे, दहशत माजविण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून घडतात अशी ठिकाणे निश्चित करण्यात येत आहेत. या परिसरात संबंधित पोलिस ठाण्याकडून कारवाईचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
– शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिसप्रमुख

Back to top button