खासदार संजय राऊत, विनायक राऊत कान फुकरे नेते : राजेश क्षीरसागर यांची टीका | पुढारी

खासदार संजय राऊत, विनायक राऊत कान फुकरे नेते : राजेश क्षीरसागर यांची टीका

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सातत्याने पाठबळ दिले आहे. त्यांना माझ्या कार्याची माहिती आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपदासाठी माझा क्लेम असेल, असे स्पष्ट मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात व्यक्त केले. ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत व खा. विनायक राऊत हे कान फुकरे नेते आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सार्‍यांचे लक्ष आहे. या महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. याबाबत विचारले असता क्षीरसागर म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रात पाठबळ देण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांचे आहे. 2019 मधील माझ्या पराभवानंतर शिंदे यांनी सातत्याने मला पाठबळ दिले आहे. विकासकामासाठी भरभरून निधी दिला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माझ्याकडे कायम ठेवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत 40 आमदार होते, त्यावेळी 41 वा मीही होतो. प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्तारावेळी माझ्या नावाची चर्चा झाली होती. पण संधी मिळाली नाही. आपले काम पाहता यावेळी मंत्रिपदासाठी आपलेच नाव असेल, असेही त्यांनी सांगितले.

आव्हाड नाटक कंपनीचे कलाकार

पोलिस कारवाईवरून आ. जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधार्‍यांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे नाटक कंपनी कलाकार आहेत. त्यांनी आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटक कंपनीत काम करावे. पोलिस विनाकारण गुन्हे दाखल करत नाहीत.

Back to top button