कोल्हापूर : नाईट लँडिंगला प्रारंभ; उद्योगमंत्री उदय सामंत कुटुंबीयांसह खासगी विमानाने तिरुपतीकडे रवाना (Video) | पुढारी

कोल्हापूर : नाईट लँडिंगला प्रारंभ; उद्योगमंत्री उदय सामंत कुटुंबीयांसह खासगी विमानाने तिरुपतीकडे रवाना (Video)

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांच्या द़ृष्टीने रविवारची (दि. 13) रात्र ऐतिहासिक ठरली. विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली. प्रथमच रात्रीच्या वेळी विमानाने उड्डाण घेतले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत कुटुंबीयांसह खासगी विमानाने रात्री आठ वाजून 46 मिनिटांनी तिरुपतीकडे रवाना झाले.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या कोल्हापुरातून श्री बालाजीच्या दर्शनासाठी उड्डाण केलेल्या विमानाने कोल्हापूरच्या नाईट लँडिंग सुविधेचे एकप्रकारे उद्घाटनच केले, हाही योगायोगच ठरला.

कोल्हापूर विमानतळाला डिसेंबर 2021 मध्ये ‘डे-आयएफआर’ परवाना मिळाला होता. यापूर्वी द़ृश्यमानता 5 हजारांपेक्षा कमी असल्यास विमानाचे टेकऑफ अथवा लँडिंग करता येत नव्हते, या परवान्यामुळे 800 मीटर द़ृश्यमानतेपर्यंत विमानाचे टेकऑफ आणि लँडिंगची सुविधा निर्माण झाली. यामुळे दिवसभर विमानाचे लँडिंग किंवा टेकऑफ करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. नाईट लँडिंगमधील हा पहिलाच टप्पा होता.

जुलै महिन्यात ‘डीजीसीए’ने कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगला मान्यता दिली. यानंतर विमानतळाच्या नाईट लँडिंग, विस्तारित धावपट्टीबाबत दि. 22 सप्टेंबर रोजी ‘एआयपी’ (एरॉनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन) मध्ये प्रसिद्धी करण्यात आली आहे. या प्रसिद्धीनंतर 40 दिवसांनी ही सुविधा सुरू होते. दि. 2 नोव्हेंबर रोजी हे 40 दिवस पूर्ण झाले. यानंतर कोल्हापूरचे विमानतळ संपूर्ण जगाच्या हवाई नकाशावर आले. दि. 3 नोव्हेंबरपासून कोल्हापूरचे विमानतळ नाईट लँडिंगसाठी सज्ज झाले.

तब्बल 79 वर्षांनी नियमित प्रवासी सेवा

कोणत्याही शहराच्या विकासात सुसज्ज विमानतळाचे सर्वाधिक योगदान असते. याच दूरद़ृष्टीतून छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूर विमानतळ बांधले. 5 जानेवारी 1939 रोजी त्यांनी हे विमानतळ वापरासाठी खुले केले. मात्र, नियमित विमानसेवा सुरू होण्यास तब्बल 79 वर्षे लागली. डिसेंबर 2018 पासून उडान योजनेंतर्गत कोल्हापूर विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू झाली.

कोल्हापूरचे आकाश अहोरात्र खुले

कोल्हापूर विमानतळाने आपली क्षमता तर सिद्ध केलीच; पण कोल्हापुरात प्रचंड संधी असल्याचेही दाखवून दिले. यामुळेच कोरोना काळात उडान योजनेतील सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारे विमानतळ म्हणून कोल्हापूरचा गौरव झाला. उडान योजनेतील समावेशानंतर खर्‍या अर्थाने कोल्हापूर विमानतळाचा कायापालट झाला. सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पाठपुराव्याने कोल्हापूरला नाईट लँडिंगचीही सुविधा उपलब्ध झाली.

ऐतिहासिक क्षणाचे हे ठरले साक्षीदार

आज कोल्हापूर विमानतळावरून ‘व्हीएसआय’ व्हेंचर या कंपनीच्या ‘यूटी सीआरए’ या चार्टर विमानाने उड्डाण केले. रात्रीच्या वेळी उड्डाण करणारे ते पहिलेच विमान ठरले. या विमानाचे सारथ्य कॅप्टन उत्पल कुंढू यांनी केले. को-पायलट म्हणून महिला वैमानिक तरंग करोच या होत्या. क्रू मेंबर म्हणून नीलिमा लावन होत्या. कोल्हापूर विमानतळावरून रात्रीच्या वेळी उड्डाण करणारे पहिले प्रवासी म्हणून मंत्री सामंत यांच्यासह नीलम सामंत, आस्मी सामंत, रवींद्र सामंत, स्वरूपा सामंत, केशव शिर्के, कविता शिर्के आणि रोहित कटके यांची नोंद झाली.

या टेकऑफसाठी विमानतळ संचालक अनिल शिंदे, वाहतूक नियंत्रक संदीप श्रीवास्तव, भारतीय हवामान विभागाचे आर. एम. वाळके, तुषार गवळी, कम्युनिकेशन विभागाचे व्यवस्थापक रवी लामकाने, बाला सुंदरम, पोलिस दलाचे उपनिरीक्षक विलास भोसले, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे विश्वनाथ कारंडे, ग्राऊंड हँडलर प्रवीण आढाव यांनी काम पाहिले. ‘एमआयडी’चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता ए. ए. ढोरे, उपअभियंता सुनील अपराध, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, प्रसाद कटाळे यांच्यासह क्यूआरटी पथक, पोलिस, सुरक्षा दलाचे 26 जवान, प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारीही या क्षणाचे साक्षीदार ठरले.

प्रथमच रात्री विमानतळ गजबजला

नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यानंतर आज प्रथमच विमानाचे उड्डाण झाले. पहिलेच प्रवासी राज्याचे उद्योगमंत्री असल्याने त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अधिकारी आले होते. अधिकारी, पोलिस, विमानतळाचे कर्मचारी, यामुळे प्रथमच रात्री विमानतळ गजबजला होता.

हे माझे भाग्यच : मंत्री सामंत

कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी उड्डाण करणारा पहिला प्रवासी म्हणून मला संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोमवारी आपण दिल्लीला जाणार आहोत. तिरुपतीला जाण्यासाठी कोठून जावे हा विचार करत होतो, कोल्हापुरात नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाल्याचे समजले आणि येथून तिरुपतीला जाण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे कोल्हापुरात उद्योजक येतील, येथील औद्योगिक विकास होण्यास मदत होईल, त्याद़ृष्टीने लवकरच औद्योगिक वसाहतीची पाहणीही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कंपन्यांनी रात्रीही विमानसेवा सुरू करावी : शिंदे

आज प्रथमच रात्रीच्या वेळी विमानाचे यशस्वी उड्डाण झाले. यामुळे आता कोल्हापूरचा विमानतळ रात्रीच्याही विमानसेवेसाठी सज्ज झाला आहे. प्रवासी वाहतूक करणार्‍या कंपन्यांनीही आता रात्रीही विमानसेवा सुरू करावी, असे आवाहन विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी केले.

Back to top button