कोल्हापूर : शिवछत्रपतींची जगदंबा तलवार कशी गेली इंग्लंडकडे, परत मिळणार का?

कोल्हापूर : शिवछत्रपतींची जगदंबा तलवार कशी गेली इंग्लंडकडे, परत मिळणार का?
Published on
Updated on

कोल्हापूर, सागर यादव : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य शिवछत्रपतींनी ज्या तलवारींच्या जोरावर निर्माण केले, त्यापैकी एक जगदंबा तलवार इंग्लंड येथील सेंट जेम्स पॅलेसमध्ये राणीच्या वैयक्तिक संग्रहात रॉयल कलेक्शन ट्रस्टकडे आहे. तमाम भारतीयांची अस्मिता असणारी शिवछत्रपतींची इंग्लंडमधील जगदंबा तलवार 2024 पर्यंत मायदेशी परत आणण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ सुरू असणार्‍या जगदंबा तलवारीसाठीचे आंदोलन यशाच्या टप्प्यात आले आहे.

…अशी गेली इंग्लंडकडे तलवार

इ.स. 1875 मध्ये करवीर छत्रपतींच्या गादीवर खानवटकर भोसले छत्रपती शिवाजी (चौथे) दत्तक आले. त्यावेळी सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यात होता. करवीर संस्थानचा दिवाण म्हणून महादेव वासुदेव बर्वे कारभार पाहत होता. त्याचा इंग्रज साथीदार कोल्हापूरचा पॉलिटिकल एजंट स्नायडर होता. इ.स. 1875 च्या ऑक्टोबर महिन्यात ब्रिटिश साम्राज्याचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारताच्या भेटीवर आला होता. त्याला भेटण्यासाठी संपूर्ण भारतातील राजे महाराजे मौल्यवान नजराणे घेऊन गेले.

करवीरचे अल्पवयीन छत्रपती शिवाजी महाराज चौथे हेही प्रिन्स ऑफ वेल्सला भेटण्यासाठी महादेव बर्वे, पॉलिटिकल एजंट स्नायडर, कोल्हापूरचे जहागीरदार कागलकर घाटगे, बावडेकर पंत अमात्य, विशाळगडकर पंतप्रतिनिधी, इचलकरंजीकर घोरपडे या व्यक्तींसह मुंबईला गेले. त्यांनी दि. 9 नोव्हेंबर 1875 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स याला एक प्राचीन रत्नजडित तलवार व एक कट्यार या वस्तू भेट दिल्या होत्या. अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आपल्या 'शोध भवानी तलवारीचा' या पुस्तकात दिली आहे.

मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे प्रयत्न

सन 1980 ला मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी इंग्लंडमधील शिवछत्रपतींची तलवार भारतात परत आणण्याची घोषणा केली होती. त्यावेळी तलवारीचा विषय वादग्रस्त झाला व त्याला राजकीय वळण लागले. बॅ. अंतुले यांना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी 'पुढारी'च्या अग्रलेखातून पाठबळ दिले. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे या प्रश्नावर अंतुलेंवर प्रचंड टीका करत असताना दैनिक 'पुढारी' मात्र बॅरिस्टर अंतुलेंच्या बाजूने ठामपणे उभा होता. इ.स. 1971 ते 1981 पर्यंत भवानी तलवारीविषयी दै. 'पुढारी'ने अनेक अग्रलेख लिहिले. यातून शिवछत्रपतींच्या तलवारीविषयी, अभ्यास न करता विनाकारण वाद निर्माण करणार्‍या संशोधक आणि राजकारण्यांनाही आपल्या लेखणीने फटकारले होते.

…यांचेही मोलाचे प्रयत्न

काशिराम रत्न सावंत तथा तात्यासाहेब देसाई कुंभरत्न (पो. कुलसर, जि. रत्नागिरी) यांनी श्री जगदंबा भवानी तलवार पुन:प्राप्ती मंडळ स्थापून इंग्रजांकडे असलेली तलवार भारतात परत यावी यासाठी प्रयत्न केले. याशिवाय अ‍ॅड. भास्कर घोरपडे या भारतीय व्यक्तीने लंडनच्या न्यायालयात 11 वर्षे कायदेशीर लढाई करून भारताला नटराजाची मूर्ती मिळवून दिली होती. याच पध्दतीने शिवछत्रपतींची तलवाहरही भारतात यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. इंग्लंड मध्ये स्थायीक असणारे आणि डॉ. आंबेडकर सेंटरी ट्रस्ट लंडन चळवळीचे श्रीकृष्ण गमरे यांनीही शिवरायांच्या जगदंबा तलवारीसाठी सात्तत्याने पाठपूरावा केला होता. सप्टेंबर 2000 मध्ये गुजरात मधील महाराज श्री भोगीलाल पांचाळ व दिव्या पटेल यांनी शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचे व्हिडिओ शुटींग आणि फोटो काढून ती सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचविली होती. गमरे व पांचाळ यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेवून तलवार परत आण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खा. संभाजीराजे यांनीही शिवछत्रपतींची इंग्लंडमधील तलवार मायदेशी आणण्याची घोषणा केली होती. सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र व अ.भा. मराठा महासंघानेही यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते.

विविध माध्यमातून सात्तत्याने जनजागृती

जगदंबा तलवारीसाठी सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र व शिवदूर्ग संवर्धन आंदोलनाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून सात्तत्याने प्रयत्न सुरुच आहेत. जनजागृतीसाठी मशोध भवानी तलवारीचाफ या संशोधन ग्रंथाच्या तब्बल 20 आवृत्ती प्रकाशीत करण्यात आल्या आहेत. व्याख्याने, चर्चासत्र, सोशल मिडीया, लेख, व्हीडीओ सीडी यासह विविध माध्यमातून हे प्रयत्न अखंड सुरुच आहेत. इतकेच नव्हे तर अलिकडेच इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले ऋषी सुनाक यांना ट्विटद्वारे जगदंबा तलवार भारताला परत देण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल सुर्वे, मोडीलिपी अभ्यासक अमित आडसुळे व सहकारी सक्रिय आहेत.

जगदंबा तलवारीची व्हिडिओ क्लिप

सन 2000 मध्ये गुजरात मधील महाराज श्री भोगीलाल पांचाळ व दिव्या पटेल यांनी शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचे व्हिडिओ शुटींग आणि फोटो काढून ती सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचविली होती. गमरे व पांचाळ यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेवून तलवार परत आण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे सर्वप्रथम प्रयत्न

शिवछत्रपतींची इंग्लंडमध्ये असणारी तलवार भारतात परत यावी यासाठी सर्वप्रथम दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी प्रयत्न केले. इ. स. 1971 मध्ये त्यांनी रजिस्ट्रार, लॉर्ड चेंबर लेन, सेंट जेम्स पॅलेस यांच्याशी पत्रव्यवहार करून भवानी तलवारीची छायाचित्रे मागवून घेतली होती. एवढेच नव्हे तर त्यांना त्याच वेळी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम इंग्लंडमध्ये असणारी वाघनखेही शिवरायांचीच आहेत, अशा आशयाचे पत्रही आले होते. त्यामुळे ती वाघनखेही भारत सरकारने मागून घ्यावीत, अशा सूचना त्यांनी आपल्या लिखाणातून सातत्याने केल्या होत्या. तसेच सातत्याने अग्रलेखांच्या माध्यमातून तलवार भारतात परत यावी, यासाठी पाठपुरावा केला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news