कोल्हापूर : सामान्यांची चपाती, भाकरी महागाईने करपली! | पुढारी

कोल्हापूर : सामान्यांची चपाती, भाकरी महागाईने करपली!

कसबा बावडा, पवन मोहिते : गेल्या दोन महिन्यांत ज्वारीच्या दरात बारा ते पंधरा रुपयांची तर गव्हाच्या दरात तीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. अवेळी पडलेला पाऊस, त्यामुळे वाया गेलेली पिके, नवीन पीक येण्यास तीन महिन्याचा अवधी, त्याचबरोबर साठेबाजीमुळे दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम खरेदीवर होऊन ग्राहक गरजेनुसारच ज्वारी व गहू खरेदी करत आहे.

सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात महिंद्रा ज्वारीचे दर 32 ते 33 रुपयांच्या दरम्यान होते तर शाळू ज्वारीचे दर 35 ते 43 रुपयांच्या दरम्यान होते. सध्या महिंद्रा ज्वारीचे दर 42 ते 43 रुपयांच्या दरम्यान आहेत तर शाळू ज्वारीचे दर 44 ते 58 रुपयांच्या दरम्यान झाले आहेत.

सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात गव्हाचा दर 30 ते 38 रुपयांच्या दरम्यान होता. सध्या किरकोळ बाजारात गव्हाचा दर 33 ते 43 रुपयापर्यंत पोहोचला आहे. दरामध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारात ज्वारी आणि गव्हाची खरेदी गृहिणींकडून गरजेपुरती सुरू आहे. वाढत्या दरांचा बाजारावर विपरीत परिणाम होत आहे. या दरांमध्ये अजूनही एक ते दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Back to top button