कोल्हापूर : आदमापूर येथील डोंगरावर गव्याचे दर्शन | पुढारी

कोल्हापूर : आदमापूर येथील डोंगरावर गव्याचे दर्शन

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : आदमापूर (भुदरगड) येथील डोंगराच्या पायथ्याशी पायवाटेवर गव्याचे दर्शन झाले. अचानक गवा समोर दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. शनिवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता गवा आढळून आला. गवा दिसताक्षणी लोकांनी गव्याचा फोटो काढण्यासाठी हालचाल करताच काही क्षणातच गव्याने पाठीमागे फिरुन पश्चिमेच्या दिशेने धूम ठोकली.

आदमापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी गव्याचा वावर असल्याची माहिती आदमापूर ग्रामस्थांना फोनवरून देण्यात आली. आठ दिवसापूर्वी बाळुमामांची बकरी डोंगर कपारीवरुन वावरत होती. तसेच गावकरी देखील दररोज आपली जनावरे चारण्यासाठी डोंगरावर घेऊन जातात. काही तरुण युवक रनिंग करणेसाठी दररोज पठारावर जातात.त्यांनाही गवा सदृश्य प्राण्याची चाहूल लागली होती. पण खात्री नव्हती. पण प्रत्यक्षात गव्याचे दर्शन झाले.

गव्याच्या वावरामुळे ग्रामस्थांची चिंता अधिक वाढली आहे. कारण डोंगराच्या पायथ्याशी ऊस शेती असल्यामुळे ऊसतोड करणेसाठी शेतकऱ्यांना जावे लागते. शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्यापूर्वी अनर्थ घडण्यापूर्वी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन गव्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी आदमापूर ग्रामस्थानी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button